अधिसभेसाठी पॅनल बनविण्याच्या घडामोडींना वेग;१६ जागांसाठी एकूण १४३ अर्ज, आज छाननी, सोमवारपर्यंत माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:48 AM2017-11-03T03:48:36+5:302017-11-03T03:48:57+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान अर्ज भरलेल्या विविध संस्थांच्या उमेदवारांनी एकत्र येऊन पॅनल बनविण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी अर्ज माघारीनंतर पॅनलचे अंतिम चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार पार पडत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या १० तर संस्था व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ६ अशा एकूण १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधीच्या खुल्या गटातून १२, महिला गटातून २ तर अनुसूचित जाती गटातून १, अशा १५ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. पदवीधर मतदारसंघामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. पदवीधरच्या खुल्या गटातून ३४, महिला गटातून ५, ओबीसी गटातून ५, एसटी गटातून ३, अनुसूचित जाती गटातून १२, डीटी/एनटी गटातून १२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एका उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याने दाखल उमेदवारांची संख्या जास्त आहे. एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या संस्था व्यवस्थापन गटातून ४५ तर पदवीधर मतदारसंघातून १४३ इतकी आहे.
पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजित फडणवीस, अनिल विखे, अभिषेक बोके, गिरीश भवाळकर, बागेश्री मंठाळकर, अॅड. वर्षा डहाळे, डॉ. सुनील भडंगे, संदीप शिंदे यांच्यासह ९८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, राजेंद्र विखे पाटील, रमेश थोरात, संदीप कदम, नाशिक जिल्हा शिक्षण मंडळाच्या नीलिमा पवार, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे श्यामकांत देशमुख, अशोक सावंत, राजीव जगताप यांच्यासह ४५ अर्ज दाखल झाले आहेत.
गुरुवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता पॅनल बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही संस्थांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, विद्यापीठ विकास मंचचे अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी यांनी निवडणुकीकडे आम्ही राजकीय भूमिकेतून पाहत नाही, तरी विद्यापीठाच्या शैक्षणिक हितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे आवाहन केले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी ५० हजार मतदार
संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी केवळ २२९, तर पदवीधर मतदारसंघासाठी ४९ हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया बड्या संस्थांचे हे प्रामुख्याने मतदार आहेत. त्यामुळे संस्थाचालक एकत्र येऊन कसे पॅनल बनवितात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड
अधिसभा निवडणुकीमध्ये संस्था व्यवस्थापन प्रतिनिधीच्या अनुसूचित
जाती प्रवर्गातून विद्यापीठ विकास मंचच्या राजेंद्र कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला
आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
शुक्रवारी अर्जांची छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघात एकूण २२९ मतदार आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातून केवळ दोनच मतदार होते. त्यापैकी एकच अर्ज दाखल झाला.
सुनेत्रा पवारही बिनविरोध निवडल्या जाण्याची शक्यता
संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी महिला राखीव मतदारसंघातून सुनेत्रा पवार व नीलिमा पवार हे दोन अर्ज दाखल झाले आहेत.
नीलिमा पवार यांनी खुला गट व महिला राखीव या दोन्ही ठिकाणांहून अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महिला राखीव जागेचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे अधिसभेवर सुनेत्रा पवारही बिनविरोध निवडून जाण्याचा
अंदाज विद्यापीठ वर्तुळातून वर्तविला
जात आहे.