आतेभावाचा त्रास; युवतीची आत्महत्या
By admin | Published: July 5, 2017 03:33 AM2017-07-05T03:33:24+5:302017-07-05T03:33:24+5:30
आतेभावाने ‘लग्न कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीने रेल्वे खाली येऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आतेभावाने ‘लग्न कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अश्विनी तानाजी परदेशी (वय १७, रा. डॉ. बाळासाहेब हरपळेनगर, कचरा डेपोजवळ, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ जगताप (वय २५, रा. सातववाडी, सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल परदेशी (वय ३२, रा. हरपळेनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सोमनाथ हा कोमल परदेशी यांच्या सावत्र नणंदेचा मुलगा आहे. त्याचे सासवड रस्त्यावर दुकान आहे, तर अश्विनी नववीमध्ये शिकण्यास होती. आरोपी अश्विनीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकीत होता. त्याने कोमल यांना ‘तुमच्या मुलीशी माझे लग्न लावून द्या, नाहीतर मी तुम्हाला बघून घेतो. मी कोण आहे हे दाखवून देईन.’ अशी धमकी दिली होती. त्याने अश्विनी हिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून तिने ३१ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी १६ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक लोणारे करीत आहेत.