मांडवगण फराट्यात बिबट्याची दहशत
By admin | Published: June 1, 2015 05:25 AM2015-06-01T05:25:03+5:302015-06-01T05:25:03+5:30
मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बिबट्याने सात शेळ्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
न्हावरे : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बिबट्याने सात शेळ्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मांडवगण फराटा परिसरात वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी उपसरपंच महादेव फराटे यांनी केली आहे.
मांडवगण फराटा येथील शेतकरी मोहन राजाराम परदेशी, पद्माबाई जगताप, उल्हास पवार यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. पी. सातकर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. मांडवगण फराटा परिसरातील ११ वा मैल, भैरू फराटवाडी व गावातील शिवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मांडवगण फराटा परिसर भीमा नदीच्या काठावर असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली उसाची शेती, नदीकाठावर असलेले दाट जंगल, भीमेचे विस्तीर्ण पात्र त्यामुळे बिबट्याच्या वावरासाठी व रहिवासासाठी हा परिसर अनुकूल आहे. गेल्या दहा वर्षांत या भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांना नेहमीच भीतीच्या सावटाखाली वावरावे लागते. या भागात पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, या मागणीकडे वनविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यापुढे जर बिबट्याच्या हल्ल्यातून एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला वनविभागाचे आधिकारी व कर्मचारी यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)