वर्पेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने घबराट, पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:51 PM2023-09-08T16:51:18+5:302023-09-08T16:53:17+5:30
भोर ( पुणे ) : पसुरे येथील सोमजाईनगर वर्पेवाडी परिसरात रात्री दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. ...
भोर (पुणे) : पसुरे येथील सोमजाईनगर वर्पेवाडी परिसरात रात्री दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.
रतन शिळीमकर हे बुधवारी रात्री पुण्याहून पसुरेला निघाले होते. रात्री दहाच्या सुमारास पसुरे गावाच्या सोमजाईनगर-वर्पेवाडी परिसरात त्यांना बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. त्यांनी मोबाइलमध्ये त्याचे फोटो काढून चित्रीकरण केले. ही घटना लगेचच सरपंच पंकज धुमाळ व राजू धुमाळ व ग्रामस्थांना कळवली.
वेळवंड खोऱ्यात बिबट्या असून परिसरात रात्रीच्या वेळी जंगलातील प्राणी हे पाणी पिण्यासाठी धरणावर येत असतात. वेळवंड परिसरात पर्यटकांची संख्याही खूप असते. त्यामुळे पर्यटकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, भाटघर धरण खोऱ्यातील संगमनेर, पसुरे, पांगारी, कांबरे, मळे भुतोंडे, गुहिणी या ठिकाणी, नीरा देवघर खोऱ्यात व वीसगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी बिबट्या दिसून आलेला आहे. काही ठिकाणी शेळ्या व कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.