भोसरीत हवेत कोयता फिरवत दहशत, दुकानांची तोडफोड; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:59 IST2022-11-18T14:59:07+5:302022-11-18T14:59:16+5:30
चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल...

भोसरीत हवेत कोयता फिरवत दहशत, दुकानांची तोडफोड; एकाला अटक
पिंपरी : दुकानांमध्ये घुसून कोयता आणि हॉकी स्टिकने तोडफोड करण्यात आली. तसेच एका दुकानातील दोन हजार ६०० रुपये चोरून हवेत कोयता फिरवून सात ते नऊ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री नऊच्या सुमारास सद्गुरुनगर, भोसरी येथे घडली. या प्रकरणी प्रेषीत गणेश मोरे (वय २३, रा. भोसरी) यांनी गुरुवारी (दि.१७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय चव्हाण, पंकज शर्मा, अजय विरेंद्र चव्हाण (वय १८, रा. भोसरी), निलेश साळवी यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी अजय चव्हाण याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ‘आई डेअरी’ या दुकानात काम करत असताना विजय चव्हाण, पंकज शर्मा यांनी तेथे येवून फिर्यादीवर कोयता उगारला. तसेच दुकानातील दोन हजार ६०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. तसेच आरोपी व त्याचे साथीदार अजय चव्हाण, निलेश साळवे आणि इतर आरोपींनी सदगुरु नगर परिसरातील इतर दुकानांमध्ये कोयता तसेच हॉकीस्टॉकच्या सहाय्याने तोडफोड केली. तसेच कोयो हॉकीस्टीक हवेत भिरकवत दहशत निर्माण केली.