पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:37 PM2019-09-09T12:37:33+5:302019-09-09T12:51:25+5:30
आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास!
पुणे : आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास! त्यांची गाणी जितकी दर्दभरी, तेवढीच मनाला भिडणारी आहेत. त्यांच्या अनेक गझला हृदयाला स्पर्श करून जातात. पंकज उदास यांच्या सुवर्णगीतांचा नजराणा ‘लोकमत’च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कॅलेक्स ग्रुपच्या सहयोगाने उद्या (सोमवार, ९ सप्टेंबर) ‘एक मुलाकात’ ही सूरमयी संध्याकाळ रंगणार आहे. हा कार्यक्रम विशेष आमंत्रितांसाठी आहे.
लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत पंकज उदास यांच्या ‘एक मुलाकात’ या मैफलीची अनुभूती घेता येईल. या उपक्रमासाठी कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी संचालक गौरव सोमाणी यांनी विशेष सहयोग दिला आहे. कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज ही पुणे व परिसरात विविध क्षेत्रांत काम करीत असून, डॉ. गौरव सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली या समूहाची घोडदौड सुरू आहे.
पंकज उदास यांनी ‘चिठ्ठी आयी है’, ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे’, ‘वो लडकी जब घर से’, ‘करवटें बदल बदल’ अशा अनेक गाण्यांमधून त्यांनी भावना शब्दबद्ध केल्या. उदास यांच्या गायनाने भारतीय गझल क्षेत्राला नवी उभारी दिली. गझल गायनाला त्यांनी वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले.
‘जिये तो जिये कैसे’, ‘चांदी जैसा रंग’, ‘हसता चेहरा’, ‘दिल जबसें टूट गया’ अशा अनेक गझलांनी त्यांनी संगीतक्षेत्रामध्ये मैलाचे दगड निर्माण केले आहेत. ‘एक मुलाकात’मधून या सर्व गझलांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. ‘एका मुलाकात’ या सुमधूर मैफलीमध्ये त्यांच्या गझलांचा नजराणा पुन्हा एकदा रसिकांसमोर पेश होणार आहे. ‘एक मुलाकात’ हा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. हा कार्यक्रम केवळ विशेष आमंत्रितांसाठीच आहे.