वडिलांनी आमदार केले, तर मी मंत्री करणार : पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:32 AM2018-12-28T00:32:22+5:302018-12-28T00:32:36+5:30
लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांंच्यावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीचे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झाले आहे.
उरुळी कांचन : लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांंच्यावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीचे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झाले आहे. त्यांच्या मागे त्यांच्या मुलीकडून पाचर्णे यांना २०१९ मध्ये मंत्रिपद मिळवून देऊन उर्वरित मनीषा पूर्ण करू. मुंडे कुटुंबीयांचे पाचर्णे यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, असा शब्द राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या सोरतापवाडी फाटा ते शिंदवणे ३ कोटी ९६ लाख ७७ हजार, तसेच शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २ कोटी ९७ लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपा पदाधिकाºयांनी केलेल्या मागणीवर पंकजा मुंडे यांनी वरील दिलखुलास उद्गार काढले आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘आ. बाबूराव पाचर्णे यांची कारकीर्द कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा राहिली आहे. राजकीय सुसंस्कृतपणा, गर्व व अहंकार नसलेला माणूस मी त्यांच्यात पाहिला आहे. त्यांच्या कामाच्या हातोटीतून मतदारसंघात भरपूर निधी त्यांनी मिळविला आहे. मतदारसंघातील विकासाची त्यांची सर्व इच्छा पूर्ण केली जाईल.’
जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी, युवानेते अजिंक्य कांचन, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जगताप, भाजपा शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच स्वाती चोरघे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासोा चोरघे, अप्पासोा लोणकर आदी उपस्थित होते.
...अन् मंत्री भारावल्या
भूमिपूजनप्रसंगी महिलांनी आकर्षक झाडाची रोपे भेट दिली. ती पाहून त्यांनी आणखी झाडांची रोपे मिळतील का, म्हणून रोपांप्रती जिज्ञासा व आवड व्यक्त केली. फुलांची समृद्ध शेती व नर्सरी उद्योगाने प्रसिद्ध असलेल्या सोरतापवाडी गावात महिलांनी दिलेल्या अनमोल भेटीने मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच गहिवरल्या.