साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहिम
By श्रीकिशन काळे | Updated: November 23, 2023 20:01 IST2023-11-23T20:00:10+5:302023-11-23T20:01:28+5:30
विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन

साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहिम
पुणे : बंदी घातलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखूची वाहतूक अजूनही होत असल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे ६ लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पदार्थ साठवणूक व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली. छुप्या मार्गाने या मालाची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य सरकारने पानमसालावर बंदी घातलेली आहे. त्याची वाहतूक व विक्री करता येत नाही. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना या मालाची साठवणूक एका ठिकाणी होत असल्याचे समजले. त्यांनी या कारवाईत वाहन क्रमांक एमएच १४ एचयु २०४२ या वाहनातून प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही १ सुगंधित तंबाखू व एम सुगंधित तंबाखू इत्यादी पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवण करणारे आरोपी किशोर हरकचंद सुंदेचा यांच्याविरूद्ध भोसरी औद्यागिक वसाहत पोलीस ठाणे, मोशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखू जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण, व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.
इथे करा तक्रार
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.