पायात पैंजण घालून झोपल्याने होणार मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:53 AM2019-03-11T02:53:13+5:302019-03-11T02:53:36+5:30
पोंधवडी परिसरातील अफवेने महिलांची झोप उडाली; अंनिसकडून अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन
भिगवण : पायात पैंजण बोलू लागले आहे. महिलांनी रात्री झोपताना पायात पैंजण घालू नये अन्यथा जीवावर बेतू शकते, अशी अफवा पोंधवडी परिसरात पसरल्याने शनिवारी (दि. ९ ) या भागात भीतीचे वातावरण होते.
याबाबतची हकीकत अशी कि शनिवारी (दि. १०) वाजण्याच्या सुमारास पोंधवडी गावातील एकाच्या घरी नातेवाईकाने फोन करून कर्दनवाडी भागात एका महिलेला पायातील पंैजण बोलू लागले असल्याची माहिती दिली. तसेच पायात पंैजण असताना झोपी गेल्यास महिलेचा झोपेतच मृत्यू होत असल्याचे सांगितले. असा प्रकार सहा महिलांबाबत झाला असून त्यांना जीवाला मुकावे लागले असल्याची माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात याची माहिती आसपासच्या महिलांना मिळाली. त्यामुळे गावातील अनेक महिला एकत्र येत याची चर्चा सुरु होवून आपल्या पायातील पैंजण काढून आपापल्या नातेवाईकांना याची माहिती देण्यास सुरवात झाली. यातून महिला वर्गात अनाहूतपणे भीतीचे वातावरण पसरले. आपल्या नातेवाईकांना फोन करीत असताना प्रत्येक महिलेने हा प्रकार इंदापूर, गोतोंडी आणि कर्दनवाडी या भागात असा प्रकार घडल्याची माहिती सांगितल्याने परिसरातील फोन खणखणू लागले. काही वेळातच ही माहिती अनेक घरात पसरू लागली. पोंधवडी गावातील अक्षय पवार नावाच्या तरुणाने ही गोष्ट खरी की खोटी पाहण्यासाठी फोन आल्याने याचा उलघडा झाला. यानंतर ही माहिती ज्या गावातून आली होती. त्या गावात फोन करून माहिती घेतली असता या गावात हा प्रकार घडला नसला तरी वैदूवाडीत आणि घाटावर असा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले. या परिसरातील नातेवाईकांना माहिती विचारली असता त्यांनी वेगवेगळ्या गावात हा प्रकार घडला असल्याची माहिती दिल्याने ही निव्वळ अफवा असल्याचे दिसून आले.
फवा असली तरी पोंधवडी भागातील महिलांची झोप मात्र उडाल्याचे दिसून आले. पैंजण बोलते आहे ही अफवा गेली आठ दिवसांपासून पसरत असल्याची माहिती परिसरातील गावातील महिलांकडून मिळत आहे. मात्र, महिला याची माहिती आपल्या नातेवाईकांना मोबाईलवर काही क्षणात देत असल्यामुळे याच्यात वाढ होताना दिसून येत आहे. काही वर्षापूर्वी अशीच अफवा पसरली होती. यात एक डोरले मोडून दोन डोरली न केल्यास पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगीतले जात होते. यात सराफ मंडळीचे सोने विकून चांदी झाल्याचे पाहावयास मिळाले होते. आता चांदीचे पैजण मोडण्यामागे कोणाचा सोनेरी डाव आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश ढवान म्हणाले, पैजण बोलत आहे ही निव्वळ अफवा आहे. महिलावर्गाने घाबरून जावू नये.
अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका : मुक्ता दाभोळकर
महिलांनी कोणते दागिने वापरावेत हा त्याचा व्यक्तिगत भाग आहे. मुळातच स्त्री चळवळ असे मानते की, बाईने दागिने घालणे हे तिच्या वस्तूकरणाचाच एक भाग असल्याचा चळवळीतील भाग मानतो. कोणत्याही घटनेवर विश्वास ठेवताना त्यावरील कार्यकारण भाव तपासून पाहणे गरजेचे आहे. पैंजण बोलणे म्हणजे पैंजण वाजणे असाच अर्थ घेतला तर प्रत्येक पंैजण हे वाजतच असते त्याचा वाजण्याचा आणि आपलं काही बरेवाईट होण्याचा परस्परांशी काय संबंध आहे? अशा प्रकारे समाजामध्ये भीती पसरविण्याचा या मागचा हेतू असू शकतो. त्यामुळे अशा अंधश्रद्धा समाजात पसरत असताना महिनांनी एकत्र येत अशी अफवा कोठून पसरली याची माहिती घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी केले.