पानशेत धरणही शंभर टक्के भरले; साखळीतील ४ धरणांतील साठा २६ टीएमसीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:48 AM2019-08-03T09:48:21+5:302019-08-03T09:48:45+5:30
जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे.
पुणे : खडकवासला साखळीतील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार वृष्टी होत असून, खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही फुल्ल झाले आहे. साखळीतील चारही धरणांतील पाणीसाठा २६.३३ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेत धरण भरल्याने त्यातून ४ हजार ५५१ क्युसेक्सने पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी ११ वाजता तब्बल १६ हजार २४७ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. परिणामी नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले होते. सायंकाळीदेखील धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने त्यातील विसर्ग २० हजार ६८१ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला.
जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत टेमघरला १२३, वरसगाव ११७, पानशेत ९२ आणि खडकवासला धरणक्षेत्रात ३३ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर ५६, वरसगाव ३२, पानशेत २७ व खडकवासल्याला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने खडकवासल्यातून सकाळी आठ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक्सने पाणी मुठा नदीत सोडले. पानशेत धरण भरल्यानंतर तेथून विसर्ग सुरू झाल्यानंतर, खडकवासल्यातून १६ हजार २४७ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. खडकवासला साखळीतील वरसगाव धरणात १०.९२ (८५.१९ टक्के), पानशेत १०.६५ (१०० टक्के), टेमघर २.७९ (७५.१७ टक्के) व खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. तर, चारही धरणांत मिळून २६.३३ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे.
गुंजवणी धरण क्षेत्रात शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत ८२ व दिवसभरात १४ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३.६२ टीएमसी (९८ टक्के) पाणीसाठा जमा झाल्याने, धरणातून १४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते. वीर धरणात वेगाने पाणी जमा होत असल्याने शुक्रवारी पहाटे ३१ हजार ६८९ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी त्यात १३ हजार ९४ क्युसेक्सपर्यंत कपात केली. वीर धरणात ८.७७ टीएमसी (९३.२० टक्के) पाणीसाठा आहे.
नीरा देवघर धरण क्षेत्रात दिवसभरात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात १०.८३ टीएमसी (९२.३६ टक्के) पाणी जमा झाले आहे. भाटघर धरणात २०.३६ टीएमसी (८६.६२ टक्के) पाणीसाठा असून, नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा होऊ लागला आहे. चासकमान धरणात ७.४७ टीएमसी (९८.६६ टक्के) पाणीसाठा झाल्याने, शुक्रवारी
दुपारी १०,९१५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.
.........