कोरोना काळातही पानशेत, कोयनानगरला पर्यटकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:56+5:302021-02-24T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नियोजित वाई आणि पन्हाळा महोत्सव पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नियोजित वाई आणि पन्हाळा महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत. दरम्यान, पुणे विभागात महाबळेश्वर, माळशेजघाट, माथेरान, पानशेत, कार्ला कोयनानगर या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये ९० टक्के बुकिंग होत आहे, तर भीमाशंकरमधील रिसॉर्टचे बुकिंग ६० ते ७० टक्के आहे. सिंहगड आणि अक्कालकोट या ठिकाणी दोन नवे रिसॉर्ट सुरू होत आहेत, अशी माहिती एमटीडीसीचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध २० ठिकाणी पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे महोत्सव आयोजित केले जाणार होते. या महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर पर्यटन विकास संस्था, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामविकास आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये वाई आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये पन्हाळा महोत्सव नगरपालिकेच्या साहाय्याने दि. २६, २७, २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत.
.....
एमटीडीसीच्या पुणे विभागातील सर्व रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोरच खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून दिले जाते. पर्यटकांच्या प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेतली जाते.तपासण्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांचीही नियमित कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांना विश्वास वाटतो.
-दीपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे विभाग, एमटीडीसी