पानशेत बॅकवॉटरमध्ये उतरला आणि जीव गमावून बसला; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बुडून मृत्यू
By श्रीकिशन काळे | Published: April 9, 2023 05:24 PM2023-04-09T17:24:23+5:302023-04-09T17:25:15+5:30
पाण्यात जाण्याचा मोह आवरत नसल्याने पाण्याची खोली कळून येत नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका वाढतो
पुणे: पानशेत धरण, खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फिरण्यासाठी अनेकजण जात असतात. परंतु, त्या ठिकाणी गेल्यानंतर पोहता येत नसेल, तर पाण्यात उतरू नये. अन्यथा जीव गमवावा लागेल. पानशेत परिसरात एक तरूण पाण्यात उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मुळशी आपत्ती निवारण टीमच्या सदस्यांनी पाण्यात शोधून काढला.
पानशेत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मोहित हेमंत सराफ या तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्याने अनेकजण फिरायला खडकवासला, पानशेत परिसरात जात आहेत. त्यांना पाण्यात जाण्याचा मोह आवरत नाही. परंतु, पाण्याची खोली कळून येत नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका आहे. याविषयी अनेकदा जलसंपदा विभागाकडून पाण्यात उतरू नये म्हणून आवाहन करण्यात येते. तरी देखील तरूण-तरूणी व नागरिकही पाण्यात जाऊन खेळताना दिसून येतात.
तानाजी भोसले म्हणाले, पानशेत बॅकवॉटरमध्ये सात ते आठ जणांच्या तरूणांचा ग्रुप रात्री मुक्कामी होता. त्यातील एकालाही पोहता येत नव्हते. बरेच विद्यार्थी परराज्यातील होते. जो तरूण गेला तो साॅफ्टवेअर इंजिनिअर असून, मध्यप्रदेशचा होता. तो मुलगा पाण्यात पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन आला. त्यांनी आम्हाला कळवले आणि आम्ही तत्काळ घटनास्थळी पोचलो. रात्र खूप झाल्याने आणि पाणी खोल असल्याने आम्ही सकाळी रेस्क्यू करायचे ठरवले. त्यानंतर सकाळी येऊन क्यूबा डायव्हिंगवाल्यांनी १० मिनिटांत मृतदेह बाहेर काढला. रेस्क्यू करणाऱ्या टीममध्ये मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, ऋषिकेश शिवतरे, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखिल यांचा समावेश होता.
''पानशेतच्या बॅकवॉटरमध्ये अनेक ठिकाणी खोल पाणी आहे. तसेच भोवरे देखील आहेत. त्या भोवऱ्यात पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बाहेर येता येत नाही. भोवऱ्यात एकदा अडकले की, जीवच जातो. त्यामुळे नागरिकांनी बॅकवॉटरमध्ये जाऊच नये. - तानाजी भोसले, सदस्य, वन्यजीव बचाव पथक''