पंतसचिवांच्या राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:55 AM2019-02-04T01:55:04+5:302019-02-04T01:56:29+5:30
भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
भोर - भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा पडला असून, वाड्याच्या भिंतीवर झाडे उगवली आहेत. तर लाकडे मोडून पडझड झाली आहे. काचा, दरवाजा, खिडक्या मोडल्या असून, वाड्याची दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वाड्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
पंतसचिवांनी १७४० मध्ये नीरा नदीकाठावर सुमारे ४४ हजार चौरस फुटाचा अप्रतिम लाकडाचा वापर करुन वीटकाम दगडीकाम याचा सुरेख संगम करुन तीनचौकी प्रशस्त राजवाडा बांधला. राजवाड्याची उभारणी इंग्रजांच्या काळात झाल्याने पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीचा उत्तम नमुना आहे. मात्र, १८६८ मध्ये वाडा आगीत जळाला. त्यामुळे १८६९मध्ये पुन्हा श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी दोन लाख रुपये खर्च करुन वाड्याची नव्याने उभारणी केली होती. भोरच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या वाड्याने नुकतीच दीडशे वर्षे पूर्ण केली आहेत.
राजवाड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी टपºया उभारल्या असून, विविध पक्षांची तसेच शासकीय कार्यालये आहेत. यामुळे राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस पूर्वेकडील आणी उत्तरेकडील लाकडाची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उगवली आहेत. खिडक्या तुटलेल्या असून, काचा फुटलेल्या आहेत. पावसाचे पाणी पडून लाकडांची मोडतोड झाली आहे. यामुळे वाड्याच्या बाहेरील व आतील बाजूची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाड्याचे मूळ रूप कायम ठेवून वाड्याच्या दुरुस्तीची व संवर्धनाची गरज आहे. मात्र, या वास्तूच्या संवर्धनासाठी आबाराजे पंतसचिव यांनी २००६ ते आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार करुन दुरुस्तीचा नकाशा नगरपालिकेकडे देऊन परवानगी मागितली आहे. मात्र, नगरपालिकेने मागील महिन्यात त्यांना पत्र दिले आहे, की आपणास खराब भाग काढून घेण्यासाठी यापूर्वी कळवले आहे. धोकादायक झालेला भाग उतरवून घेण्यास अथवा दुरुस्त करण्यास महाराष्ट्र नगरपालिका कायदा १९६५ मधील कलम १९५ अन्वये परवानगी देण्यात येत आहे.
राजवाड्यात वर्षभर विविध प्रकारच्या मालिका, हिंदी व मराठी चित्रपट यांचे शूटिंग सुरु असते. त्यामुळे वारंवार भिंतीवरचे कलर वारंवार बदलले जातात. अनेक लग्नसमारंभही राजवाड्यात होतात याकडे लक्ष देण्याची गरज असून, वाड्याची दुरुस्ती करुन भोरच्या वैभवात भर घालणाºया संस्थानकालीन वाड्याचे जतन करणे गरजेचे आहे.
नगरपालिकेला दिलेल्या नकाशाप्रमाणे राजवाड्याची दुरुस्ती आणी डागडुजी करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. त्याच्यासह उत्तरेकडील अतिक्रमणे काढून द्यावीत. त्यानंतर आम्ही वाड्याचे मूळ रूप न बदलता दुरुस्ती करणार आहोत.
- आबाराजे पंतसचिव
राजवाड्याच्या सर्व बाजूकडील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढून राजवाडा अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केला जाईल. शिवाय पालिकेने दुरुस्तीची परवानगी दिली आहे.
- संतोष वारुळे,
मुख्याधिकारी भोर न. पा.