विक्रमी वेळेत पन्वर ‘जावळीचा राजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:46+5:302021-02-05T05:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारताचा आंतरराष्ट्रीय स्पर्धक आणि माजी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेता अरविंद पन्वर याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताचा आंतरराष्ट्रीय स्पर्धक आणि माजी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेता अरविंद पन्वर याने ओएनपी सह्याद्री क्लासिक सायकल शर्यतीत वर्चस्व राखत अव्वल क्रमांक पटकावला. प्रतापगडला जाणाऱ्या अंबेनळी घाटाचा मार्ग सर्वांत कमी वेळेत पूर्ण करीत त्याने ‘जावळीचा राजा’ हा किताबही मिळविला. सुदर्शन देवर्डेकर याने दुसऱ्या क्रमांकासह लक्षवेधी कामगिरी नोंदविली.
महाबळेश्वर परिसरातील चार घाटांच्या आव्हानात्मक मार्गावर शनिवारी पहाटे सुरु होऊन सायंकाळी ही शर्यत संपली. एकूण २१० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत अरविंदने नवा शर्यत विक्रम नोंदविला. २०१९ मधील पहिल्या शर्यतीचा विजेता माँटी चौधरीला चौथा क्रमांक मिळाला. तेव्हा माँटीने चार तास दोन मिनिटे वेळ नोंदविली. माँटीचा प्रशिक्षक अरविंदने तीन तास ५१ मिनिटे ३६ सेकंद नोंदविली. मुळचा मेरठचा अरविंद पूर्व रेल्वेत नोकरी करतो.
चार तासांपेक्षा कमी वेळ नोंदविलेला तो पहिलाच व एकमेव स्पर्धक ठरला. ३२ किलोमीटर अंतराचा पश्चिम घाटांमधील सर्वाधिक अंतराचा घाट त्याने एक तास २९ मिनिटे ३६ सेकंद म्हणजे दीड तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला. अरविंदला एक लाख एक रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच ‘जावळीचा राजा’ किताबाचे दहा हजार एक रुपये अशी बक्षीस रक्कम मिळाली.
सुदर्शनने चार तास ९ मिनिटे ५८ सेकंद वेळेत दुसरा क्रमांक मिळविला. तीस वर्षांचा सुदर्शन मुळचा कोल्हापूरचा असून तो पुण्याचा रहिवासी आहे. सुदर्शनला ५० हजार एक रुपये, तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी देवेंदर कुमार याला २५ हजार रुपये मिळाले. ४० वर्षे व त्यावरील वयाच्या स्पर्धकांच्या मास्टर्स गटात महेश अय्यरने पहिला क्रमांक मिळविला. त्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
या गटात १६ स्पर्धकांनी शर्यत पूर्ण करीत पदक आणि प्रमाणपत्राची कमाई केली. यात स्वतः संयोजक आणि प्रायोजक डॉ. अविनाश फडणीस यांचा समावेश होता. त्यांनी एकूण तब्बल आठ तास सायकलिंग करीत ही कामगिरी नोंदविली. महिला गटात आठपैकी सहा जणींनी शर्यत पूर्ण केली. अंजली रानवडे हिने पहिला क्रमांक मिळविला. घाटाचा दुसरा टप्पा तिने दोन तासांपेक्षा कमी वेळेत (१.५६.५०) पूर्ण केला.