पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:08 IST2025-02-25T13:08:00+5:302025-02-25T13:08:41+5:30
गजा मारणेने आपली टोळी निर्माण करून मोठी दहशत निर्माण केली, त्यातूनच राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करून राजकीय वरदहस्त मिळवला होता

पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर
पुणे : आयटी अभियंत्याला मारहाणप्रकरणी कुख्यात गुंड गजा ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (५७) याच्यासह टोळीविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. दरम्यान, पोलिस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाईचा इशारा गजा मारणे याला दिला होता. त्या भीतीपोटी गजा मारणे हा सोमवारी (दि. २४) त्याच्या आईसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात शरण आला. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
कोथरूड परिसरात कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिस आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे.
३७ वर्षात २८ गुन्हे, दोनदा तडीपार, मोक्काची कारवाई..
गुंड गजा मारणे याच्यावर गेल्या ३७ वर्षात तब्बल २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडाला दोनदा तडीपार केले होते. तसेच यापूर्वी चार वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर त्याची आलिशान कारमधून भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीद्वारे त्याने एकप्रकारे पोलिसांना शह दिल्याचे मानले गेले.
१९९१ मध्ये २ वर्षांसाठी तडीपार
मूळ मुळशी तालुक्यातील असलेला गजा मारणे हा कोथरूडमधील शास्त्रीनगर येथे राहण्यास आला. त्याच्यावर मारामारीचा पहिला गुन्हा १९८८ साली डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यातच मारामारीचे दोन, तर समर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. १९९१ मध्ये दोन मारामारीचे गुन्हे डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे त्याला १९९१ मध्ये २ वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यानंतर तीन-चार वर्षे शांततेत गेली. कोथरूड पोलिस ठाण्यात १९९६ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याची गुन्हेगारी वाढत असल्याने त्याच्याकडून २००८ मध्ये १ वर्षाचा बाँड घेण्यात आला होता. तरीही त्याचे गुन्हे करणे सुरूच असल्याने २०१२ मध्ये पुन्हा एक वर्ष त्याला तडीपार करण्यात आले. प्रत्येक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर ११० प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल
गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.
राष्ट्रवादीतून प्रवेश रद्द
गजा मारणे याने आपली टोळी निर्माण केल्याने त्याची कोथरूड परिसरात मोठी दहशत आहे. त्यातूनच त्याने अनेक राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करून राजकीय वरदहस्त मिळवला. त्याची पत्नी जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेविका झाल्या होत्या. अनेकजण गजा मारणे याची घरी जाऊन भेट घेत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनीही काही महिन्यांपूर्वी गजा मारणे याची घरी जाऊन भेट घेतली. त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निलेश लंके यांनी त्याची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गजा मारणे याला प्रवेश देण्यात आला होता. परंतु, त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला होता.
गजा मारणेला जमिनीवर बसवले
गजा मारणेला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा अटक केली असून, त्याची कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१), अमोल विनायक तापकीर (३५, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा मारणे याचा भाचा असून, तो अद्याप फरार आहे. तर रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांनादेखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले आहे. गजा आणि रूपेश याला याबाबत चाहूल लागताच दोघे फरार झाले होते. कोथरूड पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके दोघांचा शोध घेत होती. मात्र ते मिळून येत नव्हते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोघांना जेरबंद करण्यास पथकांना सांगितले होते. त्यासाठी पोलिसांनी गजासह त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याच्या ७४ ठिकाणी झाडाझडती घेतली.