पोप्या भोसलेने केल्या होत्या सात घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:44 AM2017-07-29T05:44:53+5:302017-07-29T05:44:57+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका अट्टल चोरट्यास अटक केली आहे. त्याने साथीदारांच्या मतदतीने यवत, शिक्रापूर, शिरूर, लोणी कंदमध्ये धुमाकूळ घातला होता
लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका अट्टल चोरट्यास अटक केली आहे. त्याने साथीदारांच्या मतदतीने यवत, शिक्रापूर, शिरूर, लोणी कंदमध्ये धुमाकूळ घातला होता. तब्बल सात घरफोड्या व एक जबरी चोरी त्याने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोप्या ऊर्फ पोपट ऊर्फ गणेश बबन ऊर्फ डबन भोसले (वय २५, रा. आलेगाव पागा, शिरूर, जि. पुणे) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे जगताप येथे पडलेल्या दरोड्यात तो फरार होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी पिंपळे जगताप येथील भंगाराचे दुकानामध्ये ८ ते १० इसमांनी मालक अक्रम खान यास डोक्यात लोखंडी सळीने व चाकूने वार केले. ४ हजार २०० रुपये व मोबाइल घेऊन ते पळून गेले होते. यात दुकान मालक अक्रम ऊर्फ एहसान उल्ला खान मृत झाले होते. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली होती. गुन्हा घडल्यापासून पोप्या भोसले हा फरार होता. त्यानंतर त्याने त्याचे साथीदार मयूर भरदार काळे (वय २३, रा. जातेगाव, मोरेवस्ती, शिरूर) व इतर दोन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करून धुमाकूळ घातला होता. सात घरफोड्या व एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, संदीप पखाले,पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, नीलेश कदम, रौफ इनामदार, विद्याधर निश्चित, रवी शिनगारे, सागर चंद्रशेखर, सचिन गायकवाड, भारत कोळी, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.