पेपर दाेनशे गुणांचा; मग त्यापेक्षा जास्त गुण मिळाले कसे? तलाठी परीक्षा गुणवत्ता यादीत गाेंधळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 09:19 AM2024-01-08T09:19:34+5:302024-01-08T09:20:16+5:30
या प्रकाराची एसआयटी मार्फत चाैकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे....
पुणे : तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दाेनशे गुणांचा पेपर असतानाही काही उमदेवारांना चक्क दाेनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची एसआयटी मार्फत चाैकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे.
महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती- २०२३ परीक्षेची गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. ५) प्रसिद्ध केली आहे. तलाठ्यांच्या ४ हजार ४६६ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले हाेते. छाननीअंती १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज पात्र झाले आणि त्यातील तब्बल ८ लाख ६४ हजार ९३० विद्यार्थ्यांची ५७ सत्रांत परीक्षा पार पडली हाेती.
राज्यात तलाठी परीक्षा तीन सत्रांत झाली. त्याचा निकाल प्रसिद्ध हाेत आहे. अनेक सत्रांत परीक्षा पार पडल्यामुळे त्याचे नाॅर्मलायझेशन करताना काही उमेदवारांना दाेनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. यावरून दाेनशे गुणांचे पेपर असेल तर दाेनशे पेक्षा जास्त गुण कसे देण्यात आले, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
नाॅर्मलायझेशनमध्ये गुण कमी जास्त हाेऊ शकतात. मात्र, त्यातील अनेक विद्यार्थ्यांना इतर विभागांच्या परीक्षांमध्ये कमी गुण आहेत आणि तलाठी भरती परीक्षेत ते टाॅपर असल्याचे दिसून येत आहे. ही बाब शंका निर्माण करणारी आहे. यामुळे विद्यार्थी गाेंधळून गेले आहेत. या प्रकाराची एसआयटी मार्फत चाैकशी झाली पाहिजे.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती