पेपरफुटी झालेली आराेग्यभरतीची गट क आणि ड ची परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:55 AM2022-06-30T10:55:07+5:302022-06-30T10:56:35+5:30
राज्य शासनाने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला...
पुणे : पेपरफुटी झालेली वादग्रस्त आराेग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची परीक्षा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे याबाबतच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. नवीन जाहिरात काढल्यावर त्यामध्ये जे नवीन उमेदवार अर्ज करतील, म्हणजेच ज्यांनी रद्द झालेल्या परीक्षेत अर्ज केलेले नाहीत, त्या उमेदवारांना मात्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.
सार्वजनिक आराेग्य विभागामार्फत गट क व गट ड संवर्गांच्या दि. २४ ऑक्टाेबर २०२१ आणि ३१ ऑक्टाेबर २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. या दाेन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हाॅटस्ॲपवर व्हायरल झाल्या हाेत्या. या प्रकरणी आराेग्य विभागाने पुणे सायबर पाेलिसांकडे तक्रार दिली हाेती.
पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पेपरफुटीतील मुख्य आराेपी आराेग्य विभागाचा सहसंचालक डाॅ. महेश बाेटले याच्यासह आराेग्य विभागातील इतर अधिकारी, शिक्षक, एजंट यांना अटक केली हाेती. तेव्हापासून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवारांकडून हाेत हाेती. अखेर ही मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव अर्चना वालझाडे यांनी बुधवारी जाहीर केला आहे.