एका रात्रीत दारूसाठ्यासाठी कटफळमध्ये उभारले पत्राशेड
By admin | Published: May 13, 2017 04:31 AM2017-05-13T04:31:58+5:302017-05-13T04:31:58+5:30
कटफळ येथील परिसरात बुधवारी (दि. १०) सकाळी १०च्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूचा साठा सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवडी : कटफळ येथील परिसरात बुधवारी (दि. १०) सकाळी १०च्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूचा साठा सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन महिला आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी एस. व्ही. जाधव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींकडून २९ हजार रुपये किमतीची ३५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. सरोजिनी बिजेन पवार तसेच सारिका गोपी पवार या दोन महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर तीन महिला आरोपी फरार आहेत. दरम्यान, दारू दुकानांना मुख्य मार्गांपासून ५०० मीटर अंतरची मर्यादा घातल्यामुळे अवैध दारू धंद्यांना ऊत आला आहे.
कटफळमध्ये गावठी दारूचा साठा करण्यासाठी अवघ्या रात्रीत पत्र्याचे शेड उभारण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक पत्राशेड ग्रामस्थांना दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे या पत्राशेडमध्ये नेमके काय ठेवले, याचा तपास झाला. त्यात गावठी दारूचा साठा आढळून आला.
बारामती ग्रामीण पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. त्यांच्या सहकारी असलेल्या तीन महिला फरारी झाल्या. पुढील तपास बिट अंमलदार बाळासाहेब सोनवलकर करीत आहेत.