कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 10:22 IST2023-09-10T10:21:18+5:302023-09-10T10:22:16+5:30
अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या
पुणे : अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी पहाटेच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, १३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील जितेंद्र शिंदेसह तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एका विशेष फास्ट - ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.