प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:09 AM2017-08-02T04:09:39+5:302017-08-02T04:09:39+5:30
वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे. यामुळे समाज सशक्त बनला आहे, असे मत लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्यावतीने प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. त्यावेळी दर्डा बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश जैन, खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आदी उपस्थित होते.
दर्डा म्हणाले, ‘जैन तत्वज्ञान विज्ञानवादी आहे. मनुष्य म्हणून जगलात तर महावीर होणे सरल आहे. सर्वांप्रती दया, करुणा, सद्भावना आणि दातृत्वाची वृती असावी. प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी ओढलेली साधनेची रेषा आज सद्भावनेचा मार्ग बनली आहे. प्रत्येक धर्मात चातुर्मासाचे महत्व आहे. जीवन जगण्याची शैली चातुर्मास शिकवतो. संतांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र म्हणजे ज्ञान, ध्यान आणि साधनेचे प्रतीक आहेत. मात्र, आमच्या अंगावरील वस्त्रे ही भटकत्या आस्थेचे प्रतीक आहेत. ही अस्थिरता संतच दूर करू शकतात.’
सुरेश जैन म्हणाले, ‘प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी विश्वासाठी समता, शांती आणि प्रेमाचा विचार दिला असून त्याचा विश्वामध्ये प्रसार होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या जळगावमध्ये त्यांच्या झालेल्या प्रवचनाच्या आठवणी आजही ताज्या आहेत.’
जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राजेश सांकला, माणिकचंद दुगड, प्रा. अशोक पगारीया, विजय भंडारी, विजयकांत कोठारी, प्रफुल कोठारी, विलास राठोड, बाळासाहेब धोका, नरेंद्र सोळंकी, सुमतीलाल कर्नावट, बाबुशेठ बोरा, रामलाल शिंगवी यांची विशेष उपस्थिती होती.