कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:50+5:302021-05-22T04:11:50+5:30

लक्ष्मण मोरे / पुणे : नाल्यामधून नदीपात्रात जाणाऱ्या मैलापाण्यामुळे खालील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी ...

Paradise blossomed on the nala during the Kovid period | कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन

कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन

Next

लक्ष्मण मोरे / पुणे : नाल्यामधून नदीपात्रात जाणाऱ्या मैलापाण्यामुळे खालील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी नदीमध्ये जाऊ नये याकरिता कोविड काळात घोरपडी येथील सोपानबागे शेजारील नाल्यावर सुरू झाला अनोखा प्रयोग. नाला खोलीकरण-रुंदीकरण करून दीड वर्षात तब्बल २७ हजार झाडे लावली. नाल्याचे पाणी वळवून पाच तळ्यांमध्ये आणण्यात आले. हे पाणी झाडांना देण्यात आले. आजमितीस याठिकाणी पपई, पेरू, केळी, नारळ आदी फळझाडे लगडली आहेत. तर, अनेक प्रकारची फुलझाडे बहरून डोलू लागली आहेत. ही किमया साधली आहे 'ग्रीन थंब' या संस्थेच्या पुढाकारातून.

लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांच्या ग्रीन थंब संस्थेने लोकसहभागातून याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. विविध प्रजातींची तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. यामध्ये १३ हजार बांबूच्या झाडांचा समावेश आहे. दोन किलोमीटरचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य झाला आहे.

नाल्याच्या पाण्यामध्ये नायट्रोजन, कॅल्शियम यासोबतच झाडांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये असल्याने झाडांना त्याचा फायदा झाला. ही झाडे आठ नऊ महिन्यांची असली तरी त्याची वाढ आठ ते दहा वर्षांची झाडे असल्यासारखी झाली आहे.

या कामामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठी मदत केली. त्यांनी ही वनराई फुलविण्यासाठी यंत्रसामग्री दिली आहे.

मोरांसाठी मक्याची झाडे लावण्यात आली. तर पोपटांसाठी सूर्यफूल लावण्यात आले. आता या बागेत मोर, पोपट, चिमण्या, बुलबुल आदी पक्षी स्वच्छंदी विहार करीत आहेत.

----

मी माझ्या मित्रांच्या सोबतीने या बागेत आलो होतो. कर्नल पाटील यांनी उभ्या केलेल्या कामामुळे मी भारावून गेलो आहे. मी या कामात सहभागी झालो असून निसर्गठेवा जपण्यासाठी आणि हे नंदनवन आणखी फुलविण्यासाठी या मोहिमेत काम करीत आहे. भविष्यात ही बाग भैरोबानाल्यापर्यंत विकसित करण्याचे नियोजन केले आहे.

- वजीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर शहर, रा. पुणे

------

नदीपात्रातून जाणाऱ्या आपल्या मैलापाण्यामुळे पुढील ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना विविध आजार होत आहेत. नदीपात्रात हे पाणी जाऊ नये याकरिता नाल्याचे पाणी वळविण्यात आले. पाच तळ्यांमधून हे पाणी झाडांना देण्यात येत आहे. या ठिकाणी २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याच्या पाण्यावर ही बाग जोपासण्याचा यश आले आहे. केवळ लोकसहभागातून हे शक्य झाले आहे.

- सुरेश पाटील, लेफ्ट. कर्नल (निवृत्त), संस्थापक, ग्रीन थंब

Web Title: Paradise blossomed on the nala during the Kovid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.