पुणे : बिटकॉईन गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’कडून समांतर तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:30 PM2022-04-16T12:30:35+5:302022-04-16T12:32:36+5:30
या प्रकरणात लवकरच दोन्ही आरोपींचा ताबादेखील ईडी घेण्याची शक्यता...
पुणे : बिटकॉईन गैरव्यवहार प्रकरणाचा आता ‘ईडी’ने समांतर तपास सुरू केला आहे. पुणे सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेले सायबर तज्ज्ञ पंकड घोडे याने मनी लाँड्रिंग केली असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने ईडी तपास करत आहे. या प्रकरणात लवकरच दोन्ही आरोपींचा ताबादेखील ईडी घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशातील बिटकॉईन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास ईडी करत आहे. त्यात पुण्यात २०१८ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा ईडी तपास करत आहे.
पुणे सायबर पोलिसांना तपासात मदत करताना बिटकॉईन घेतलेल्याच्या आरोपावरून घोडे व पाटील यांच्यावर दाखल गुन्ह्याची गेल्याची ‘ईडी’ने गेल्या आठवड्यात माहिती घेतली होती. आता या गुन्ह्यात ईडीने समांतर तपास सुरू केला आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात घोडेने बिटकॉईनमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांबरोबर आता ‘ईडी’ने देखील तपास सुरू केला आहे. या दोघांचा ताबा देखील ईडी घेण्याची शक्यता आहे.
बिटकॉईन या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून २०१८ मध्ये दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू होता. या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक मदत करण्यासाठी ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशनतर्फे पंकज घोडे व केपीएमजीतर्फे रवींद्र पाटील यांची नेमणूक केली होती. मात्र, या दोन सायबर तज्ज्ञांनी डेटाचा गैरवापर करून त्यावेळी अटक केलेल्या आरोपीच्या वॉलेटमधून बिटकॉईन घेतल्याचे समोर आले आहे.