सरपंच व उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून पॅरालिसिस झालेल्या ग्रामपंचायत शिपायाची कार्यालयातच आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 04:21 PM2021-12-02T16:21:51+5:302021-12-02T16:22:05+5:30
जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रकाश शिवराम गोंदे वय ४७ ( रा .अहिनवेवाडी ता.जुन्नर ) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत शिपायाचे नाव आहे. यासंबंधी अहिनवेवाडीच्या सरपंच भिमाबाई नंदकुमार खंडागळे व उपसरपंच स्वप्नील वसंत अहिनवे दोघेही (रा.अहिनवेवाडी ता.जुन्नर) यांच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
शिपायाच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्या चिठ्याच्या मजकुरावरुन आत्महत्या केलेल्या प्रकाश गोंदेची पत्नी नंदा प्रकाश गोंदे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिपाई प्रकाश गोंदे यास पँरालिसिसचा त्रास होता. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. सरपंच आणि उपसरपंच स्वप्नील अहिनवे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. गोंदे यांना दवाखाना आणि औषधोपचार यासाठी राहणीमान भत्त्याची गरज होती. तो त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे मागितला. तो देण्यास दोघांनी नकार दिल्याने गोंदे यांनी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. पुढील तपास जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत.