पार्सल ऑफिसमध्ये स्कॅनर, सीसीटीव्ही लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:41+5:302021-07-10T04:09:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल ऑफिसमध्ये आता लगेज स्कॅनर मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल ऑफिसमध्ये आता लगेज स्कॅनर मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. त्यामुळे पार्सलने येणाऱ्या व जाणाऱ्या वस्तूची तपासनी करणे शक्य होईल. दैनिक लोकमतने ९ जुलै रोजी रेल्वे पार्सलद्वारे बॉम्ब, शस्त्रे पाठविणे शक्य ? हे वृत्त प्रसिद्ध केले होते.
पुणे स्थानकावरून रोज जवळपास ८० टन माल पार्सल सेवेद्वारे देशाच्या विविध शहरात रेल्वेने पाठविले जाते. मात्र त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नव्हती. कोणत्याही तपासणीविना आपण पार्सलद्वारे सामान पाठवू शकतो, हे वृत्त दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली असून, या संदर्भात लवकरच पार्सल ऑफिसमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची पूर्तता केली जाणार आहे.
------------------------
देशभरात हेच चित्र :
देशातील प्रमुख रेल्वे स्थानकावर पार्सल ऑफिसमध्ये हेच चित्र आहे.कोट्यवधी रुपयांचा उत्पन्न मिळवून देणाऱ्या या विभागात सुरक्षेसंदर्भात कोणतीच उपाययोजना नाही. सर्वच स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे अशीच आहे.
------------------------------
पार्सल ऑफिसमध्ये सुरक्षेसंदर्भात उपाययोजना केल्या जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच प्रशिक्षित श्वानाकडून मालाची तपासणी केली जाईल. शिवाय माल पाठविणारा व माल स्वीकारणारा यांची नोंद ओळखपत्रासह घेण्यात येत आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे