तब्बल १२ वर्षांंनंतरही रेल्वेतील पार्सलचे ‘ट्रॅकिंग’ अद्यापही कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:55 AM2019-05-21T11:55:11+5:302019-05-21T12:03:18+5:30

दिल्लीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतरत्र त्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण...

The parcel track remains on the paper Even after 12 years | तब्बल १२ वर्षांंनंतरही रेल्वेतील पार्सलचे ‘ट्रॅकिंग’ अद्यापही कागदावरच

तब्बल १२ वर्षांंनंतरही रेल्वेतील पार्सलचे ‘ट्रॅकिंग’ अद्यापही कागदावरच

Next
ठळक मुद्दे२००६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये‘पीएमएस’ची चाचणी यशस्वी सध्या पार्सलचे सर्व काम कागदावरच ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर नागरिकांना पार्सलचे ट्रॅकिंग करणे सोपे

पुणे : नागरिकांना आपले पार्सलचे ऑनलाईन ट्रॅकिंग करता यावे यासाठी २००६ मध्ये पहिल्यांदा दिल्ली स्थानकावर पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर या टप्प्यात पुण्यातही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार होती. पण अद्यापही ही ट्रॅकिंग प्रणाली कागदावरच आहे. ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 
दिल्ली रेल्वे स्थानकावर दि. १ नोव्हेंबर २००६ रोजी ‘पार्सल मॅनेजमेंट सिस्टीम’ (पीएमएस)ची अंमलबजावणी सुरू झाली. या प्रकल्पामध्ये मध्य रेल्वेतील पुण्यासह नागपुर, मुंबई व भुसावळ स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. दिल्लीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतरत्र त्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अजूनही ही प्रणाली अद्ययावत करण्याचेच काम सुरू असल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीस विलंब लागत आहे. या प्रणालीअंतर्गत पार्सल विभागासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून नागरिकांना आपले पार्सलचे ‘रिअल टाईम’ ट्रॅकिंग करणे सोपे होणार आहे.
सध्या पार्सलचे सर्व काम कागदावरच होते. त्यामुळे नागरिकांना आपले पार्सल कोणत्या गाडीमध्ये ठेवले, कुठपर्यंत पोहचले, कोणत्या स्थानकावर उतरविले याबाबतची कोणतीच माहिती समजत नाही. पार्सल बुकिंगच्या पावतीवर नागरिकांनी संपर्क क्रमांक दिला असल्यासच रेल्वे कर्मचारी त्यांना कळवितात. मात्र, त्यालाही अनेकदा विलंब होतो. संपर्क क्रमांक नसल्याने नागरिकांनाच पार्सल विभागात येवून किंवा चौकशी करावी लागते. यामध्ये विलंब होऊन दंड भरण्याची वेळ येते. नवीन प्रणालीमुळे हा ताप वाचणार आहे. पार्सल विभागात पार्सल गेल्यानंतर त्याला स्वतंत्र बारकोड दिला जाईल. तसेच ‘प्रोग्रेसिव्ह रेफरन्स रेकॉर्ड’ (पीआरआर) क्रमांक मिळेल. त्याआधारे नागरिकांना पार्सलचे संकेतस्थळावरून ट्रॅकिंग करता येईल. या प्रणालीमध्ये शुल्क भरण्याची ऑनलाईन सुविधा असेल. 
-------------
दिल्लीमध्ये ‘पीएमएस’ची चाचणी यशस्वी झाली आहे. मध्य रेल्वेमध्येही ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याची चाचपणी सध्या सुरू आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर नागरिकांना पार्सलचे ट्रॅकिंग करणे सोपे होणार आहे. 
- संजय सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक
पुणे विभाग, मध्य रेल्वे
------------
पार्सलचे पॅकिंग रेल्वेच करणार
सध्या नागरिकांनाच पार्सलचे पॅकिंग करावे लागते. दुचाकी वाहनांचे पॅकिंग करायचे असल्यास पार्सल विभागाबाहेर त्यासाठी ३५० ते ४५० रुपये घेतले जातात. नागरिकांना सोसावा लागणारा हा भुर्दंड आता बंद होणार आहे. रेल्वे प्रशासनाने पॅकिंगचे काम निविदा प्रक्रिया राबवून एका खासगी संस्थेला दिले आहे. त्यांना त्याचे दरही निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार असल्याचे संजय सिंग यांनी सांगितले.

Web Title: The parcel track remains on the paper Even after 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.