फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन
By admin | Published: April 1, 2017 02:23 AM2017-04-01T02:23:31+5:302017-04-01T02:23:31+5:30
भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आंदोलन केले
धनकवडी : भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आंदोलन केले.
भारती विद्यापीठ इंग्लिश माध्यमिक विद्यालयाच्या वतीने वर्ष २०१७-१८ या वर्षासाठी फीमध्ये अचानक ३२ टक्के वाढ करण्यात आली आहे. पालकांनी ३ वेळा व्यवस्थापनाशी यासंदर्भात चर्चा केली. गुरुवारी (दि. ३०) पालकांना चर्चेसाठी बोलावले; मात्र अचानक फोन करून होणारी नियोजित बैठक रद्द केल्याचे सांगितल्याने संतप्त पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले व शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी केली.
मागील वर्षी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची फी २८ हजार होती, ती या वर्षी वाढवून ३६ हजार करण्यात आली. शासकीय नियमानुसार दर २ वर्षांनंतर ५ ते १५ टक्के फीवाढ अपेक्षित असताना तसेच पालक किंवा पालक प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता फीमध्ये वाढ केल्याने पालक संतप्त झाले.
याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सीबीएसई बोर्ड अध्यक्ष राजेशकुमार चतुर्वेदी तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देण्यात आले. यावर तोडगा न निघाल्यास एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन करणार असल्याचे पालक प्रतिनिधींनी सांगितले. (वार्ताहर)