शाळा प्रवेशासाठी पालक ताटकळत, संख्या जास्त, जागा मर्यादित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:04 AM2018-04-02T04:04:37+5:302018-04-02T04:04:37+5:30
चिमुरड्यांना पूर्व प्राथमिकसाठी (नर्सरी, एलकेजी) तसेच प्राथमिकच्या इयत्तांसाठी प्रवेश मिळविणे दिवसेंदिवस अत्यंत अवघड बनत चालले आहे. चांगल्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाची मर्यादित संख्या व त्यातुलनेत प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या यामुळे हा प्रश्न जास्त गंभीर बनत चालला आहे.
पुणे - चिमुरड्यांना पूर्व प्राथमिकसाठी (नर्सरी, एलकेजी) तसेच प्राथमिकच्या इयत्तांसाठी प्रवेश मिळविणे दिवसेंदिवस अत्यंत अवघड बनत चालले आहे. चांगल्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाची मर्यादित संख्या व त्यातुलनेत प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या यामुळे हा प्रश्न जास्त गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांची गुणवत्ता वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
औंधमधील स्पायसर शाळेचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळपासून पालकांनी रांग लावल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. शहरातील नामांकित शाळाांतील प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी हेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शाळेची पहिली घंटा जूनमध्ये वाजणार असली तरी अनेक शाळांच्या पूर्व प्राथमिकची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या महिन्यांतच पूर्ण झाली आहे. तरीही अद्याप शाळेत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. एकीकडे विद्यार्थी मिळत नसल्याने महापालिकेच्या शाळा बंद केल्या जात असताना दुसरीकडे प्रवेशाअभावी विद्यार्थी व पालक हवालदिल झाले असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशाच्या जागा वाढविण्यासाठी महापालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार
होण्याची आवश्यकता शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविल्यास तिथेही प्रवेशासाठी मोठ्या संख्येने पालक
पुढे येऊ शकतील. महापालिका शाळांची संख्या मोठी असल्याने
याव्दारे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी
मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध
होऊ शकतील.
डोनेशन देत असाल तरच प्रवेश देऊ शाळेत पूर्व-प्राथमिकसाठी प्रवेश मिळविणे कठीण बनत चालल्याच्या परिस्थितीचा काही शाळा गैरफायदा उठवित मनमानी कारभार करत आहेत. शाळेत प्रवेश हवा असल्यास ४० ते ५० हजार रुपये डोनेशन देण्याची मागणी पालकांकडे केली जात आहे. काही शाळांनी नर्सरीसाठी प्रवेशाचे अर्ज पालकांकडून भरून घेतले आहेत. प्रवेशाची यादी येत्या काही दिवसात लावली जाणार आहे. त्यापूर्वी काही शाळा पालकांना बोलावून घेऊन शाळेसाठी डोनेशन देण्याची मागणी करीत आहेत. डोनेशन दिले तरच तुमच्या पाल्याचे नाव यादीत लावू, असे सांगितले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
ई-लर्निंगसाठी झुंबड : पालिका शाळेकडे पाठ
1पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. नुकतेच विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने पालिकेच्या १७ शाळांचे दुसºया शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आले. पालिकेच्या काही शाळांची ही दयनीय अवस्था असतानाच पालिकेच्याच राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल तसेच आकांक्षा फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये मात्र प्रवेशासाठी मोठी झुंबड उडत आहे.
2महापालिकेच्या काही शाळा आकांक्षा फाउंडेशनकडून दत्तक घेण्यात आल्या. त्या शाळांचे व्यवस्थापन आकांक्षा फाउंडेशनकडून चालविले जाते. या ठिकाणी चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी खूप मेहनत इथल्या शिक्षकांकडून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्येही वेगवेगळे प्रयोग राबवून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
महापालिका शाळांचे व्हावे सक्षमीकरण
चांगल्या शाळांमधील प्रवेशाची संख्या अत्यंत मर्यादित आहे, त्या तुलनेत प्रवेश हवा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शहराच्या सर्व भागात महापालिकेच्या शाळांचे नेटवर्क आहे. या शाळांकडे इमारती, खेळाची मैदाने या चांगल्या पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. केवळ या शाळांचा दर्जा उंचावल्यास प्रवेशाच्या मोठ्या जागा उपलब्ध होऊ शकतील.
- अॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी
नर्सरी प्रवेशासाठी पालकांनी जागून काढली रात्र
पुणे : नर्सरीत प्रवेश मिळविण्यासाठी शनिवारी रात्री तब्बल ३०० हून अधिक पालकांनी औंधमधील स्पायसर शाळेच्या बाहेर फुटपाथवर बसून रात्र काढली. चांगल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिकसाठी प्रवेश मिळावा, म्हणून पालकांना विविध प्रकारचे दिव्य पार पाडावे लागत आहे. राजकीय पुढाकाºयांकडे तसेच शिक्षण विभागातील अधिकाºयांकडे वशिला लावण्यापासून ते शाळा मागेल तेवढे डोनेशन देण्यापर्यंत पालकांना तयारी ठेवावी लागत आहे.
औंधमधील स्पायसर शाळेत रविवारी सकाळी आठ वाजता प्रवेश अर्ज दिले जाणार होते. प्रथम येणाºया ३०० जणांनाच प्रवेश दिले जाणार असल्याने शाळेचा प्रवेश अर्ज मिळविणे, हे पालकांसमोर मोठे आव्हान बनले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच पालकांनी शाळेसमोर रांग लावली. त्याचबरोबर शनिवारची संपूर्ण रात्र त्यांनी शाळेसमोरच्या फुटपाथवर झोपून काढली.
विशेष म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पालकांनीच स्वयंशिस्तीने ही रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून याबत कोणतीही सूचना नव्हती किंवा व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. संपूर्ण रात्र जागून काढण्याच्या तयारीनेच पालक आले होते. रात्र होऊ लागली तशी ही संख्या वाढू लागली. रांगेतील बहुतेकांनी घरून अंथरूण पांघरूण आणले होते. काही जण तर मच्छर अगरबत्ती लावून बसले होते. त्यांना घरच्या इतर लोकांनी रात्री जेवण आणून दिले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि पालक रात्रभर थांबणार असल्याचे माहीत असल्याने एक चहाची गाडीही येथे लावण्यात आली होती.
वाढत्या स्पर्धेमुळे पाल्याला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पालक हतबल झाले असून पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी शाळांच्या बाहेर रांगा लावत आहेत. सामान्य पालकांना मोठ्या शाळांचे शुल्क भरणे शक्य नसल्याने कमी शुल्क असलेल्या शाळांसाठी धडपड करतात. - एक पालक
मी सकाळीच नातवाच्या प्रवेशासाठी येथे आलो आहे. पूर्वीपेक्षा आता शिक्षण खूप महाग झाले आहे. त्यातही चांगल्या शाळेत पाल्याला प्रवेश घेण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. आज सुट्टीचा दिवस असतानाही सकाळपासून प्रवेशासाठी आलो आहे.
- एक आजोबा