शिष्यवृत्तीच्या बदलांबाबत पालक उदासीन
By admin | Published: October 2, 2015 12:47 AM2015-10-02T00:47:43+5:302015-10-02T00:47:43+5:30
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते.
पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला तीन आठवड्यानंतरही पालकांचा अत्यंत नगण्य प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत परीक्षा परिषदेकडे आलेल्या सूचनांमध्ये शिक्षकांचाच सहभाग दिसत असून, बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी सूचना, मत व्यक्त केले आहे. यावरून या प्रक्रियेबाबत पालक उदासीन असल्याने दिसत आहे.
यामुळे यंदा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन होणार नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च २०१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. उपलब्ध कालावधीचा वापर करून या परीक्षेत बदल करून सुधारणा करण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविले आहे. त्यानुसार यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील शिक्षक-पालकांकडून अभिप्राय, सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या आवाहनाला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच पालकांनी आपल्या सूचना परीक्षा परिषदेकडे पाठविल्या आहेत.
शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम व परीक्षेबाबत पालकांच्याही सक्रिय सहभागाची परीक्षा परिषदेला अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेत कोणत्या विषयांचा समावेश करणे अपेक्षित आहे, विषयांची संख्या, प्रश्नपत्रिकांसाठी लागणारा वेळ, विद्यार्थ्यांचा स्तर, इतर कोणते बदल करावेत यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचे मतही जाणून घेण्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक प्रश्नावली ठेवण्यात आली आहे. मात्र त्याला अल्पप्रतिसाद लाभला आहे. पालकांनी उदासीनता सोडून सक्रिय सहभाग करावा, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. (प्रतिनिधी)