देवतारी त्याला कोण मारी; बाळाला बेवारसपणे सोडणाऱ्या आई वडिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 07:12 PM2019-09-18T19:12:29+5:302019-09-18T19:14:51+5:30
'भगवान के घर दर है लेकीन अंधेर नहीं' याचा प्रत्यय आला असून पोलिसांनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झालेल्या आई वडिलांना शोधून अखेर अटक केली आहे.
सासवड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाचे संगोपन कसे करावयाचे व हे मुल घेवून समाजात कसे वावरणार,या भितीपोटी जोडप्याने लहान बाळास दोघांनी मिळून त्यास एका कापडात गुंडाळून त्याला जवळच्याच पोल्ट्री शेड मध्ये मरणासन्न अवस्थेत सोडून दोघेही पसार झाले. परंतु म्हणतात ना, 'भगवान के घर दर है लेकीन अंधेर नहीं' याचा प्रत्यय आला असून पोलिसांनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झालेल्या आई वडिलांना शोधून अखेर अटक केली आहे.
दत्तात्रय हरिभाऊ भोसले हे ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास परिंचे - हरणी रोडवरील कासारवड येथील त्यांच्या शेतात गेले असता त्यांना त्यांच्या गोठ्याचे पत्र्याच्या शेडमधून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी त्यांनी जवळ जावून पहिले असता एक साधारण १५ दिवस वयोमान असलेले बालक सोडून गेल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांना फोन करूनही माहिती दिल्यानंतर त्यास परींचे येथिल दाखल रुग्णालयात करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता दोरगे यांनी पुणे येथील ससून रुग्णालय मधील बालक केंद्रात दाखल केले. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनेचा कसून तपास केल्यानंतर थोड्याच दिवसांत बाळाची आई मिळून आली. तिला ताब्यात घेवून चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे देवून या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी महिलेची डीएनए तपासणी केल्यावर संबंधित महिलाच या बाळाची आई असल्याची खात्री झाली. त्यानंतर तिला पोलिसी खाक्या दाखविताच पटापट माहिती दिली. तिने सांगितले कि, ती पतीपासून अनेक महिने विभक्त आहे, ती एका शेतात कामाला होती. तेथे असणाऱ्या एका व्यक्ती बरोबर तिचे संबंध जुळून आले व त्यातूनच दिला दिवस गेले. परंतु अशा अवस्थेत बाहेर पडल्यास सर्वाना माहिती होईल. त्यामुळे एकाच ठिकाणी राहू लागली. एवढेच काय पण संबंधित व्यक्तीनेच तिचे बाळंतपण केले. बाळ सुखुरूप जन्माला आले. परंतु असे किती दिवस लपून राहणार म्हणून त्यांनी त्या बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी संबंधित महिलेच्या प्रियकरालाही ताब्यात घेवून अटक केली आहे.