बुद्ध्यांक कमी असल्याचे सांगून मुलीला शाळेतून काढल्याची पालकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:30 AM2018-07-11T03:30:20+5:302018-07-11T03:33:36+5:30
आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे.
महाळुंगे : आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. या संदर्भात शाळेने मात्र सदर विद्यार्थिनीला शाळेतून काढले नसून तिचा बुद्ध्यंक इतर मुलांपेक्षा कमी असल्याने पालकांना मराठी शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी : यशस्वी अंकुश भोसले ही विद्यार्थिनी बाल शिक्षण हक्कअंतर्गत ६ वर्षांपासून द्वारका स्कूल महाळुंगे येथे शिक्षण घेत आहे. ती इयत्ता चौथीत शिकते.
पालकांनी या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझ्या मुलीला शाळेतून काढण्यात आले आहे. शाळेच्या या निर्णयामुळे माझ्या मुलीची वेळ आणि वर्ष वाया जाणार आहे. तिच्यावर घरी राहण्याची नामुष्की ओढवली आहे. तिला दुसऱ्या खासगी शाळेत प्रवेश घेणे कसोटीचे आहे. शाळेने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मला व माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. माझ्या मुलीला काही येत नाही, हे शाळेला तब्बल ६ वर्षांनी कळले का? असा सवालही करण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षण द्यायचे सोडून विचित्र वागणूक देत आहेत.
या संदर्भात शाळा प्रशासनाने सांगितले, की तिला विशेष शिक्षक देऊन शिकवणी घेत आहोत. विद्यार्थिनीला इंग्लिश अभ्यासक्रम समजण्यास त्रास होतो. तिला एक प्रकारचा मानसिक तणाव येतो. त्यामुळे पालकांना आम्ही वारंवार ३ वर्षांपासून सूचना करूनही त्यांनी मुलीची बुद्धिमत्ता चाचणी केली नाही. यावर शाळने विनंती करून तिला जबरदस्तीने पालकांच्या सोबत पाठविले व आयक्यू तपासणीसाठी पैसे देऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. तपासणी अहवालानुसार पालकांना सांगितले, की तिला या अभ्यासक्रमाचा ताण येतो. तिची अभ्यासामध्ये सुधारणा करायची असेल, तर तिला समजणाºया मराठी शाळेत तुम्ही तिला टाका. आम्ही शिकवायला तयार आहोत; परंतु तिचे नुकसान नको! आपल्याला समजल्यावर वेळ निघून गेलेली असेल तरीदेखील पालक हे ऐकत नसून शाळेविरोधात चुकीची तक्रार करीत आहेत. शाळेने त्या मुलीला शाळेतून काढले नाही, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.
माझ्या मुलीला शाळेला बालशिक्षण हक्कानुसार मोफत शिक्षण द्यायचे नाही; त्यामुळे शाळा खोटारडे आरोप करून दुसºया शाळेत शिक्षण घ्यायला सांगत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी गप्प बसणार नाही. शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेणार आहे.
-अंकुश भोसले, विद्यार्थिनीचे वडील
शाळेने यशस्वीला काढून टाकले नाही. ती शाळा चालू झाल्यापासून शाळेत येत नाही. तिचे नाव हजेरी पुस्तकावर आहे; पण आम्ही पालकांना योग्य सल्ला दिला होता. ते समजून घेत नाहीत. आम्ही ६४ मुले बालशिक्षण हक्कातून शिकवत आहोत. एका विद्यार्थ्याने आम्हाला काहीच अडचण नाही. या वर्षी आरटीईमधून मुले कमी होती, तर आम्ही पंचायत समितीकडून नवीन प्रवेश घेतले आहेत.
- स्वाती आंबरे, मुख्याध्यापिका द्वारका स्कूल