मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच पालकांची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:32 PM2019-01-08T23:32:48+5:302019-01-08T23:33:29+5:30
सुनंदा पवार : तावशी येथे माता पालकांशी संवाद
बारामती : मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच खरी संपत्ती समजून महिला पालकांनी मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत’ अभियानाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी केले. अभियानांतर्गत इंदापूर तालुक्यातील तावशी येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होत्या.
माता पालकांशी संवाद साधताना पवार म्हणाल्या, ‘‘मासिक पाळीबाबत ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांच्यात संवाद नसल्याने वयात आलेल्या मुलींच्या आरोग्याच्या अनेक अडचणी आहेत. याच अडचणी लक्षात घेऊन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्यावतीने हे अभियान पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर या तीन तालुक्यांतील १५० शाळा आणि ४० हजार मुलींपर्यंत हे अभियान पोहोचले आहे. महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर मन प्रसन्न राहते. परिणामी घर, कुटुंब आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ राहतो. सामाजिक जाणिवा लक्षात घेता महिला आरोग्याविषयी आपल्याला मनापासून काम करणे गरजेचे आहे. सॅनिटरी नॅपकिन हा विषय महिला आरोग्यासाठी गरजेचा असताना त्याविषयी अनेक शंका निर्माण केल्या जातात. मुली वयात आल्यानंतर त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक बदल होत असतात. हे बदल लक्षात घेता पालक म्हणून आपली जबाबदारी म्हणून काही कर्तव्य आपण पार पाडणे गरजेचे आहे.’