आईवडिलांनी दीड वर्षाच्या मुलीला सोडले वा-यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 08:39 PM2018-01-09T20:39:23+5:302018-01-09T20:39:34+5:30

क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Parents leave their daughter a year and a half | आईवडिलांनी दीड वर्षाच्या मुलीला सोडले वा-यावर

आईवडिलांनी दीड वर्षाच्या मुलीला सोडले वा-यावर

googlenewsNext

पुणे : क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना दोन वर्षांपूर्वी एक मुलगी झाली. या तरुणीने हक्कसोडपत्र करून मुलीचा ताबा भारतीय समाज सेवा केंद्राकडे दिला. मात्र, वडिलांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने या मुलीचे पुढे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वराह्ण नावाची अवघी एक वर्ष आठ महिन्यांची गोंडस मुलगी आहे. या मुलीची आई कर्वे रस्त्यावरील नामवंत महाविद्यालयामध्ये शिकत होती. अकरावीला असताना तिच्या एका मैत्रिणीला भेटायला येणा-या मित्रांपैकी एका मित्राशी तिची ओळख झाली. वारंवार होणा-या भेटीगाठीमधून या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ही तरुणी आईवडील व भावासोबत राहते. या काळात त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध आल्याने ही तरुणी गरोदर राहिली. या तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. या गोळ्या घेतल्याने या तिचा गर्भपात झाला. यावरुन त्यांच्यामध्ये भांडणे झाली. काही दिवसांनी मित्रांकरवी त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क केला.
ही तरुणी बीएससीच्या द्वितीय वर्षाला शिकत असताना या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी घरामधून पळून जाऊन देवाची आळंदी येथे लग्न केले. काही दिवसांनंतर ही तरुणी गरोदर राहीली. मात्र, तिचा पती तिची काळजी घेत नव्हता. त्यावरुन त्यांच्यामध्ये भांडणे सुरु झाली. त्याच्या स्वभावाला कंटाळलेली ही तरुणी माहेरी निघून गेली. मात्र, आईवडीलांनी समजूत काढल्यावर ही तरुणी पुन्हा पतीकडे परत आली. मात्र, त्याने आणि सासुसास-यांनी तिला घरामध्ये घेण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात, तिच्या पतीला मारामारी प्रकरणी पोलिसांनी अटक करुन तुरुंगात पाठविले.

या सर्व प्रकारामुळे तिला होणा-या अपत्याची काळजी वाटू लागली. त्याचे भवितव्य काय असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे आईवडीलांशी चर्चा करुन तिने गर्भपाताचा निर्णय घेतला. डॉक्टरांची भेट घेऊन गर्भपाताची तयारी दाखविली. मात्र, डॉक्टरांनी गर्भपात होऊ शकत नसल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने भारतीय समाज सेवा केंद्रामध्ये जाऊन संचालिका सगुणा परांडे यांची भेट घेतली. काही काळ ही तरुणी माहेर संस्था संचालित वात्सल्य धाम येथे राहिली. रास्ता पेठेतील एका रुग्णालयामध्ये या तरुणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी मुलीचे नाव स्वरा ठेवले. मात्र, या मुलीचे नेमके करायचे काय असा प्रश्न तिच्यासमोर होता.

संस्थेच्या समाजसेविकांनी तिच्यासमोर ठेवलेल्या सर्व पर्यायांचा विचार करुन शेवटी मुलीचे हक्कसोडपत्र करुन मुलीचा ताबा भारतीय समाज सेवा केंद्राकडे देण्यात आला. महिला बाल कल्याण समितीनेही यावर निर्णय दिला. मात्र, जोपर्यंत वडीलही निर्णय देत नाहीत तोवर संस्थेचाही मुलीवर पुर्ण अधिकार राहणार नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. मागील दिड वर्षापासून संस्था ह्यस्वराह्णच्या वडीलांशी संपर्क साधत आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतरही वडील आणि आजीआजोबा यांनी मुलीला सांभाळण्यात असमर्थता दाखविली आहे. हक्कसोडही दिले जात नाही आणि पालकत्वाची जबाबदारीही घेतली जात नसल्याचे संस्थेसमोर अडचण उभी राहिली आहे.

तरुणीचे शिक्षण बीसीए (द्वितीय वर्ष) झालेले आहे. तर ती ज्याच्या प्रेमात पडली तो अवघा नववीपर्यंतच शिकलेला होता. मात्र, ओळखीमधून झालेल्या प्रेमामुळे या तरुणीचे आयुष्यभराचे नुकसान झाले. क्षणिक आकर्षणामुळे तिला त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीही लक्षात आली नाही. लग्नानंतर हे सर्व समजू लागल्यावर तिला पश्चात्ताप झाला. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. अलिकडच्या काळात उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित मुलांमध्ये होणा-या प्रेम प्रकरणांमधून तरुणींचे नुकसान होत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
----------
संस्थेने स्वराच्या वडीलांना तीस दिवसात येऊन जबाबदारीबाबत स्पष्टीकरण द्यावे अन्यथा त्यांना जबाबदारी घ्यावयाची नाही असे समजून मुलीची जबाबदारी संस्थेची राहील, असे कळविले आहे.

Web Title: Parents leave their daughter a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे