शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागृती हवी
By admin | Published: July 25, 2016 02:18 AM2016-07-25T02:18:54+5:302016-07-25T02:18:54+5:30
मुलांना शाळेत घालण्यापासून त्यांनी इंजिनिअर व्हावे, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. मुलांचे करिअर घडविण्यापर्यंत पालकांकडून मुलांना विविध स्पर्धांमध्ये उतरविले जाते.
पुणे : मुलांना शाळेत घालण्यापासून त्यांनी इंजिनिअर व्हावे, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. मुलांचे करिअर घडविण्यापर्यंत पालकांकडून मुलांना विविध स्पर्धांमध्ये उतरविले जाते. मात्र, मुलांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची संधी दिली पाहिजे. यासंदर्भात पालकांमध्येच आता जागृती करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. घोकंपट्टीवर आधारित शिक्षण पद्धतीतही मूलभूत बदल करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
डीपर व सर फाऊंडेशनतर्फे दिलीप अरळीकर व सुनीता अरळीकर यांना अवचट यांच्या हस्ते महापालक सन्मान पुरस्काराचे रविवारी वितरण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, डॉ. रवींद्र कोल्हे, डीपरचे संस्थापक सचिव हरिष बुटले, सर फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दरम्यान, संस्थेच्या दुसऱ्या सत्रात संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनाही आदर्श संस्थापालक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डीपर, सर फाऊंडेशन आणि साद माणुसकीची या अभियानांतर्गत सामाजिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
त्यात ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, विवेक वेलणकर, रूरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, हरिष बुटले, सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांनी सहभाग घेतला.
(प्रतिनिधी)