"खो-खो’खेळात ग्लॅमर नव्हतं, करीअर नव्हतं, पण प्रशिक्षकांच्या शब्दांनी बदललं आयुष्य!"
By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 19:18 IST2025-01-25T19:07:55+5:302025-01-25T19:18:00+5:30
प्रियांकाचा प्रवास: विरोधातून कर्णधारपदापर्यंतची प्रेरणादायी कथा..!

"खो-खो’खेळात ग्लॅमर नव्हतं, करीअर नव्हतं, पण प्रशिक्षकांच्या शब्दांनी बदललं आयुष्य!"
पुणे : ‘‘मी लहानपणापासून खो खो खेळत आलेय. खरंतर माझ्या आई-वडिलांनी सुरवातीला विरोध केला. कारण त्यात करीअर नव्हते. त्याला ग्लॅमर नव्हते. पण माझ्या प्रशिक्षकांनी त्यांना समजावले आणि आज आई-वडिलांना माझा अभिमान वाटतो. खरंतर त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोचू शकले नसते,’’अशा भावना भारतीय खो खो महिला संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे हिने व्यक्त केल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि.२५) भारतीय खो खो संघ विश्वविजेता ठरल्याने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. भारतीय खो खो पुरूष संघ आणि महिला संघातील खेळाडू प्रतिक वाईकर,सुयश गरगटे, रामजी कश्यप, आदित्य गणपुले, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर फिजिओथेरपिस्ट डॉ. अमीर रव्हाटे, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजित जाधव, सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप तावडे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी सर्वांचा सन्मान केला. संघाचे उपाध्यक्ष श्रीकिशन काळे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रियांका म्हणाली, भारतीय संघाची मी कर्णधार असल्याने माझ्यावर थोडासा ताण होता. कारण संघातील सर्व खेळाडूंशी समन्वय साधून चांगले खेळायचे होते. त्यामुळे हे अवघड काम होते. पण आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला चांगले ट्रेनिंग दिले होते. तसेच आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा होता. त्यामुळे आम्ही विश्वविजेतेपद जिंकू शकलो.’’
‘‘मी गेली १५ वर्षे खो खो खेळत आहे. मी राष्ट्रीय स्तरावर खेळू लागले, तसा मला घरच्यांनी देखील खूप पाठिंबा दिला. आज त्यांना माझ्यावर खूप अभिमान आहे. आई-वडिलांशिवाय हे यश मिळवू शकले नसते. आजपर्यंत मी २३ वेळा राष्ट्रीय स्तरावर आणि २ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहे,’’असे प्रियांका म्हणाली.
पुरूष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर म्हणाला, आम्ही जिंकल्यानंतर आमच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खूप आनंद होतोय. भविष्यात खो-खोला अधिक ग्लॅमर येईल. काही वर्षांपूर्वी खो खोमध्ये काहीच भविष्य नव्हते. पण आता मात्र यात चांगले करीअर होत आहे. सरकारी नोकऱ्या देखील मिळत आहेत. आमची खो खो संघटनादेखील आमच्या पाठिशी आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे. इतर राज्यांपेक्षा इथे अधिक सुविधा आहेत.’’