पालक सकारात्मक, आता तरी शाळा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:00+5:302021-09-03T04:10:00+5:30
पुणे: एकटेपणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक पालक शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. ऑनलाइन शिक्षणात सर्व ...
पुणे: एकटेपणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक पालक शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. ऑनलाइन शिक्षणात सर्व मुले सहभागी होत नाहीत. तसेच, काही ठिकाणी डोंगर दऱ्यांचा भाग असल्याने तेथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात ऑफलाइन शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना देण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कांचन आदी उपस्थित होते.
शासन आदेशानुसार तीन तासांची शाळा भरवता येईल. शाळा टप्प्या-टप्प्याने व शिफ्टमध्ये सुरू करता येतील. शाळेचा परिसर स्वच्छ व वर्गाचे निर्जंतुकीकरण करून तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा भरवता येतील. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार थर्मामीटर, ऑक्सिमीटरद्वारे दररोज प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची तपासणी करता येईल. शाळेच्या परिसरातील शासकीय रुग्णालय व आरोग्य उपकेंद्र यांच्या माध्यमातून शाळा व आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्याची प्रक्रिया सुरू ठेवता यावी, यासाठी शासनाने शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.