विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 12:07 PM2023-05-07T12:07:56+5:302023-05-07T12:08:14+5:30
मणिपूरचा संघर्ष विकोपाला गेला असून महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले आहेत
बारामती : मणिपूर येथील आयआयआयटी शैक्षणिक संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक मला आज भेटले आहेत. याविषयी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याबाबत मी चर्चा करतोय, मात्र त्यांचा संपर्क झालेला नाही. आता मी फोन द्वारे संपर्क साधणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
मणिपूर येथील इंफाळ येथे आदिवासी आणि बिगर आदिवासी या दोन समुदायांमध्ये अनुसूचित जमातीच्या दजार्बाबत संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष विकोपाला जाऊन बॉम्बस्फोट व गोळीबार सारखा हिंसाचार होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी इंफाळ येथे असणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मणिपूर राज्याच्या राज्यपालांशी बोलून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. इतर राज्यातील विद्यार्थ्यांना त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात आणले आहे. मात्र महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले असून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची विनंती पालकांनी केली आहे. मणिपूरमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे.
मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले असल्याने पालक शरद पवारांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी भेटायला आले होते. मणिपूर येथील आयआयआयटी विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले १२ विद्यार्थी अडकले असल्याची माहिती पालकांनी शरद पवारांना दिली आहे. त्यानंतर शरद पवारांनी मणिपूर येथील सरकारशी बोलून मुलांना सुरक्षा दिली असल्याचे पालकांनी संगितेल आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पालक गोविंद बागेत आले होते. इतर राज्यातील विद्यार्थी त्यांच्या राज्यात सरकारने परत नेले परंतु महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी आणण्यास दिरंगाई केल्याचे पालकांनी सांगितले आहे. तरी सरकारने विद्यार्थांना लवकर परत आणावी अशी आर्त हाक पालकांनी सरकारला दिली आहे.