पालक-विद्यार्थी बारावीच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:26+5:302021-05-03T04:06:26+5:30
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, मे महिना उजाडला तरी अद्याप ...
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, मे महिना उजाडला तरी अद्याप परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, लॉकडाऊन वाढवल्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक लवकर प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या आहेत. यंदा तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षेबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षासुद्धा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या सर्व परीक्षांचा अभ्यास आणखी किती दिवस करायचा, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे.
प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीत केव्हा सुधारणा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे देश पातळीवरच ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षणबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच विविध प्रवेश पूर्व परीक्षा आणि बारावीच्या परीक्षा या दोन्ही परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांनी किती दिवस घ्यायचा याबाबतही काही मर्यादा निश्चित झाल्या पाहिजेत.
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ४५ ते ६० दिवस लागणार
दहावीच्या परीक्षा सुरु झाल्यानंतर त्वरित उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाते. कोरोनामुळे मागील वर्षी शिक्षकांना त्यांच्या घरी उत्तरपत्रिका तपासण्याची मुभा दिली होती. यावर्षी सुद्धा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घरीच तपासाव्या लागतील, असे एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सुमारे ४५ ते ६० दिवसांपेक्षाअधिक कालावधी लागू शकतो. परिणामी निकालही लांबू शकतो. त्यामुळे शासनाने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून परीक्षांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
कोट
बारावीच्या परीक्षेच्या निकालावर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्याचप्रमाणे बारावीत मिळालेल्या गुणांचा विचार करून काही विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, याबाबत निर्णय घेतात. कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घ्याव्यात. तसेच परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात शासनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापेरेंट्स