‘ऑनलाइन गेम्स’च्या वेडामुळे पालकांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:32+5:302021-02-10T04:12:32+5:30
पुणे: ‘अरे, स्वप्निल किती वेळ खेळशील मोबाईल? बाहेर ये... आमच्याशी बोल तरी!’ मात्र मुलाचं काहीच उत्तर नाही. ...
पुणे: ‘अरे, स्वप्निल किती वेळ खेळशील मोबाईल? बाहेर ये... आमच्याशी बोल तरी!’ मात्र मुलाचं काहीच उत्तर नाही. घरोघरी हीच कहाणी! कोरोना काळात शाळा बंद. ऑनलाइन शिक्षणामुळे पालक आणि शाळांकडून मुलांच्या हातात सोपवलेले मोबाइल, टॅब, लॅपटॉप यामुळे मुलांना ‘स्क्रीन टाइम’च्या आणखी जवळ नेले आहे. मुलांचे स्वत:चे आभासी विश्व तयार झाले आहे. मुलांमधील गेम्सचे वाढते व्यसन आणि त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती पालकांसाठी चिंतेची ठरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना पुण्यात घडली. इतक्या लहान वयात मुलांमध्ये इतकी हिंसा आली कुठून असा प्रश्न यातून निर्माण झाला. मोबाइल-कॉम्प्युटर गेम्सचे व्यसन हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. कोरोना काळात तर शिक्षणपद्धतीतच आमूलाग्र बदल झाला असून जिथे पूर्वी मुलांना अर्ध्या तासाचा ‘स्क्रीन टाइम’ दिला जात होता तिथे मुलांचे अवघे विश्वच आता स्मार्ट फोन, टीव्ही, लॅपटॉपने व्यापून टाकल्याचे दिसत आहे. मनमोकळा संवाद, सर्जनशीलता, कल्पकता या गोष्टी हरवल्या असून आभासी जगामुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. एखादी मनासारखी गोष्ट न घडल्यास चिडचिड करणे, हट्टीपणा, नकारात्मकता असे मानसिक बदल मुलांमध्ये दिसून येत आहेत. ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.
------------------------------------------- -----------------------------
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाइल किंवा लॅपटॉप देणे क्रमप्राप्त आहे. पण ऑनलाइन क्लास सुरू असताना मुले गेम्स खेळत असल्याचे दिसल्यानंतर आम्ही त्यांच्या मोबाइलमधून गेम्स उडवून टाकले. मात्र मुलांनी पुन्हा गेम्स डाऊनलोड केले : अमृता देशपांडे, पालक
---------------
इंडियन सायक्रॅटिक सोसायटीच्या नियमावलीनुसार दोन वर्षांच्या आतील मुलांना स्क्रीन टाइमची परवानगीच नाही. दोन ते पाच वयोगटात मुलांना पालकांच्या सल्ल्यानुसार मोबाइलसारख्या वस्तू हाताळण्यास द्याव्यात. शैक्षणिक साहित्य म्हणून त्याचा उपयोग केला तरी त्याचा कालावधी जास्त नसावा. ५ ते १८ वयोगटासाठी मुलांच्या स्क्रीन टाइमचे नियोजन करायला हवे. कॉमन रूममध्ये बसूनच मुलांना मोबाइल किंवा तत्सम गोष्टी हाताळण्यास द्यावे. यूट्यूबसह इतर अॅपना पासवर्ड लावावा.
-डॉ. सीमा दरोडे, क्लिनिकल अँड स्कूल सायकॉलॉजिस्ट
------------------------------------------------------------------------------
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात सहजरीत्या मोबाइल आले. हिंसक गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढल्याने मुले आक्रमक होत चालली आहेत. मुलांना आता चार भिंतीतून बाहेर काढून उद्यानात, ट्रेकिंगला अथवा सहलींना घेऊन जावे.
-डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, ज्ञानदेवी संस्था