कोरोना रुग्ण वाढल्याने पालक चिंतेत; बोर्डाच्या परीक्षा कशा देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:48+5:302021-02-25T04:12:48+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर आल्या ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर आल्या असताना कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, परीक्षा पुढे न ढकलता कोरोनाविषयक नियमावलीचे काटेकोर पालन करून नियोजित कालावधीतच परीक्षा घ्यावात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबामुळे या वर्षी काही महिने परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यास परीक्षा सुरक्षित वातावरणात घ्याव्या लागणार आहेत. परंतु, त्यासाठी शिक्षण विभाग तयार आहे का? असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, सध्या दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हे अद्याप निश्चित झालेले नाही.
---
बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थ्यांनी वर्गात बसूनच दिल्या पाहिजे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल न करता राज्य मंडळाने आरोग्य विषय काळजी घेऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी.
- दिलीपसिंग विश्वकर्मा, पालक
--
विद्यार्थी परीक्षेची तयारी मनलावून करत आहेत. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्यास परीक्षेत गैरप्रकार होण्याचा धोका असल्याने ऑफलाईन पद्धतीनेचे परीक्षा घ्यावी.
- मनोहर पुनाळेकर, पालक
---
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बारावीचे विद्यार्थी आवश्यक काळजी घेऊन परीक्षा देऊ शकतात. मात्र, शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याबाबत आवश्यक नियमांचे पालन करावे. तसेच सध्या विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे राज्य मंडळाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ नये.
- शीतल हेंद्रे, पालक
---
माझी मुलगी दहावीत असून गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात भीती असली तरी विद्यार्थ्यांचे वर्ष महत्त्वाचे आहे.
- उज्ज्वला जोशी, पालक
---
विद्यार्थी कोरोना काळातही जमेत त्या साधनांचा वापर करून अभ्यास करत आहेत. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच वर्गात न जाता ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला आपली क्षमता लक्षात येईल. परीक्षा पुढे न ढकलाता नियोजित कालावधीतच परीक्षा घ्यावी
- सुदर्शना भोसले, पालक
--
कोरोनामुळे विद्यार्थी घरात बसून कंटाळले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना गांभीर्याने उपस्थिती लावत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलू नयेत. पालकांच्या मनात कोरोनाची भीती असली तरी आवश्यक काळजी घेऊन विद्यार्थी परीक्षा देतील.
मनोज केदारे, पालक
---
दहावीची परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे
बारावीची परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे