पारगावची शाळा पटसंख्यावाढीचे मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:54 AM2018-07-08T00:54:53+5:302018-07-08T00:55:06+5:30
जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर गेल्या वर्षी आली असताना काही शाळांतील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिलासादायक बाबही आहे.
केडगाव - जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर गेल्या वर्षी आली असताना काही शाळांतील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिलासादायक बाबही आहे. दौैंड तालुक्यातील पारगावच्या शाळेत मात्र यावर्षी तब्बल ३५ नवीन विद्यार्थी दाखल झाले आहेत.
पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून यावर्षी ३५0 विद्यार्थी संख्या झाली आहे. गेल्या वर्षी पटसंख्या ३१0 होती. यावर्षी त्यामध्ये ४0 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेली ५ वर्षात तब्बल ९५ विद्यार्थिसंख्या वाढली आहे. सन २0१४ साली २५५ विद्यार्थी, २0१५ मध्ये २८५ विद्यार्थी, २0१६ मध्ये ३00 विद्यार्थी , २0१७ मध्ये ३१0, तर यावर्षी २0१८ मध्ये ३५0 विद्यार्थिसंख्या झाली आहे. यापैकी इयत्ता पहिलीचा पट १00 असून, चालू वर्षी तीन तुकड्या झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शिक्षणाचे पेव फुटले असताना दिवसेंदिवस अनेक ग्रामीण विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाकडे वळू लागले. ग्रामीण पालकांना इंग्रजी शिक्षण गरजेचे वाटू लागले. यामधून गेल्या १0 वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झाली. एकट्या दौंड तालुक्यात एकूण ३0 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या. परंतु पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेने बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन शाळेतच नर्सरी, इंग्रजी, सेमी वर्ग सुरु केल्याने त्यांना या प्रयत्नात यश आले आहे.
या वेळी मुख्याध्यापक मोहन पोटे म्हणाले, की ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रगतिपथावर आहे. शाळेमध्ये चालू वर्षी १२ शिक्षक असून, विद्यार्थ्यांसाठी अक्षरसुधार प्रकल्प, गणित व इंग्रजी अतिरिक्त अध्यापन, ई-लर्निंग, चित्रकला, वाचन व संभाषण आदी उपक्रम राबवले जातात.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन बोत्रे म्हणाले, की विद्यार्थ्यांना भविष्यात टॅब्लेट देणार आहे. शाळा हायटेक करणार असून, शाळेची ख्याती वाबळेवाडी व कर्डेलवाडी (ता. शिरुर) या शाळांसारखी करावयाची आहे. यासाठी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम शाळेने नवीन इमारत बांधणीपासून, शाळेस अंतर्गत भौतिक सुविधा, परिसर सुधारणा, ई-लर्निंग, वर्षभरात विविध उपक्रम यामुळे अनेक विद्यार्थी शाळेकडे आकृष्ट झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी नर्सरीपासून या शाळेत इंग्रजी शिक्षण सुरु केले आहे. या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी दोन डी.टी.एड. शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणले आहेत. या शिक्षकांचे मानधन शालेय व्यवस्थापन स्वखर्चातून देत असते.