राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 04:51 AM2024-09-20T04:51:19+5:302024-09-20T04:52:34+5:30
युवराज संभाजीराजे म्हणाले, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे, तशीच अवस्था शिवसेना व राष्ट्रवादीची झाली आहे.
पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. त्यासाठी पुण्यात गुरुवारी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर या नेत्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली.
महाशक्तीचा एकत्रित मेळावा येत्या २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होईल, असे चटप यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, तिसरी आघाडी ही एक सक्षम पर्याय म्हणून असेल.
युवराज संभाजीराजे म्हणाले, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे, तशीच अवस्था शिवसेना व राष्ट्रवादीची झाली आहे.
...तर निवडणूक लढवणार : बच्चू कडू
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून १८ मागण्यांचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अजून उत्तर आलेले नाही. २५ तारखेपर्यंत वाट पाहू. त्यांचे उत्तर न आल्यास तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवू. आघाडीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू,’ असे बच्चू कडू म्हणाले. या वेळी ‘महायुती सोडली का?’ या प्रश्नावर कडू यांनी, ‘मी महायुतीबाहेर पडलो आहे, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?’ असा प्रतिप्रश्न केला.
जरांगे, प्रकाश आंबेडकर, ज्याेती मेटेही साेबत?
या आघाडीत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे यादेखील सामील होतील, अशी आशा या नेत्यांनी व्यक्त केली.