उद्यान निरीक्षक लाच घेताना जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:32 AM2018-04-03T04:32:28+5:302018-04-03T04:32:28+5:30
सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़
पुणे : सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़
राजेंद्र पोपट कळसकर (वय ३८, रा़ कदमवाकवस्ती, कवडी माळवाडी, लोणी काळभोर) असे या उद्यान निरीक्षकाचे नाव आहे़
तक्रारदार राहत असलेल्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या झाडांच्या मुळांमुळे त्यांच्या घरांचे नुकसान होत होते़ त्यासाठी ही झाडे तोडण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता़ त्यांच्या अर्जाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे काम राजेंद्र कळसकर यांच्याकडे होते़ त्यानुसार त्यांनी सोसायटीला भेटही दिली होती़ आपल्या अर्जाचे काय झाले, याची त्यांनी चौकशी केल्यावर झाडे तोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल़ त्यासाठी त्यांनी ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार आल्यावर २९ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली़ त्या वेळी त्यांनी ४० हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते़ त्यानुसार मनपाच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील जॉगर्स पार्क येथे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व त्यांच्या पथकाने सोमवारी सापळा रचला़ दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र कळसकर यांना पकडण्यात आले़ त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़