मंगल कार्यालयांना पार्किंग बंधनकारक
By admin | Published: November 8, 2016 01:35 AM2016-11-08T01:35:20+5:302016-11-08T01:35:20+5:30
लग्नसराईत रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. परंतु, मंगल कार्यालयांना पार्किंगची सुविधा देणे बंधनकारक आहे
पिंपरी : लग्नसराईत रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. परंतु, मंगल कार्यालयांना पार्किंगची सुविधा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन व कार्यालय मालकांची आठवडाभरात बैठक घेण्यात येणार आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
उद्योगनगरीतील प्रमुख रस्त्यांवर लहान-मोठी मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. येत्या १६ नोव्हेंबरपासून लग्नसराईचा मुहूर्त सुरू होत आहे. ज्या दिवशी लग्न असते, त्यादिवशी कार्यालय परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडींची समस्या उद्धभवते. काही कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंग सुविधा असूनही ही जागा भाड्याने दिली जाते. त्यामुळे कार्यालयांच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे होते. गेल्या वर्षी किरकोळ अपघाताच्यादेखील घटना घडल्या होत्या. या बैैठकीत कार्यालय मालकांना लग्नाच्या दिवशी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, कार्यालयाबाहेरील रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कार्यालय मालकाने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे एका व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच रस्त्यालगत कोणालाही वाहन उभे करू देऊ नये, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत कार्यालय मालकांना दिल्या जाणार आहेत. ज्या कार्यालयांतर्फे पार्किंगच्या सुविधेसह इतर सूचनांचे पालन केले जाणार नाही, अशा कार्यालयांवर कारवाईसंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला वाहतूक विभागातर्फे पत्र देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)