जंगली महाराज रस्त्यावर पार्किंगचा संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:50 AM2018-04-25T05:50:01+5:302018-04-25T05:50:01+5:30
पुणे महापालिकेतर्फे जंगली महाराज रस्त्याला (जे.एम.) एक वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
राहुल गायकवाड ।
पुणे : जंंगली महाराज रोडवर नव्याने करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेत काही ठिकाणी मोटारींसाठी तर काही ठिकाणी दुचाकीसाठी जागा निश्चित केली आहे़ पंरतु, काही ठिकाणी केवळ पी असा फलक असल्याने ही जागा नेमकी मोटारींसाठी की दुचाकीसाठी असा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे़ परिणामी दुचाकी आणि मोटारी यांचे पार्किंग केले जात असल्याने रस्ता अरुंद होत आहे़
पुणे महापालिकेतर्फे जंगली महाराज रस्त्याला (जे.एम.) एक वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या चालता यावे, यासाठी पदपथ वाढविण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणी व बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. याचबरोबर, पार्किंगची विशिष्ट रचनाही या ठिकाणी झाली आहे. मात्र हीच पार्किंगची नव्याने करण्यात आलेली रचना वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. वाहनचालक डबल पार्किंग करीत असल्याने जे. एम. रोड डबल पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी, वाहतुकीसाठी रस्ता कमी उरत आहे.
जंगली महाराज रस्ता जिथे सुरू होतो, तिथे दोन्ही बाजूंना पार्किं गची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदपथाच्या बाजूला विशिष्ट जागा करून वाहने लावता येतील, अशी रचना येथे करण्यात आली आहे. जेणेकरून लावलेली वाहने मुख्य रस्त्यावरून जाणाºया वाहनांना अडथळा ठरणार नाहीत. दुचाकी किंवा चारचाकी, याच्या पाट्या लावण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी दुचाकीसाठी जागा देण्यात आली आहे. दुचाकीचालक पदपथाला लागून असलेल्या जागेत आपली वाहने लावत असले, तरी अनेक चारचाकी चालक या दुचाकींच्या मागे आपली वाहने लावत असल्याचे चित्र आहे. परिणामी, या ठिकाणी डबल पार्किंग होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी चारचाकीसाठी जागा आरक्षित आहे, त्या ठिकाणी काही नागरिक दुचाकीसुद्धा लावत असल्याने नक्की येथे कुठले वाहन लावयाचे, याबाबत वाहनचालक गोंधळून जात आहेत. काही ठिकाणी नुसती पार्किंगची पाटी असल्याने येथे दुचाकी लावायची की चारचाकी याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत चित्र आहे. तसेच, जेथे कार पार्किंग आहे तेथे रस्त्याला समांतर गाडी लावायची की सरळ गाडी लावायची, याबाबत वाहनचालकांमध्ये जागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कशाही प्रकारे या ठिकाणी गाड्या लावल्या जात आहेत.
रस्ता अरुंद : वाहने काढणे अवघड
जंगली महाराज रस्त्याच्या नव्या रचनेमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. पदपथांची रुंदी वाढविल्यामुळे रस्त्यावरून चालणाºया पादचाºयांची संख्या कमी झाली आहे. नव्या रचनेत पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळाली नसल्याने वाहनचालक कशाही प्रकारे वाहने लावत आहेत. खासकरून डबल पार्किंगचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या दुचाकींच्या मागे चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहन काढणे अवघड जाते. काही ठिकाणी केवळ स्कूलबस आणि रिक्षांसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. तेथेही चारचाकी वाहने लावली जात आहेत. डबल पार्किंग करणाºयांवर वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई होत नसल्याने दुचाकींच्या मागे चारचाकी लावण्याचा येथे पायंडाच पडला आहे.