पार्किंग शुल्क अन्यायी
By admin | Published: August 26, 2014 04:55 AM2014-08-26T04:55:23+5:302014-08-26T04:55:23+5:30
विद्यार्थ्यांकडून मिळेल त्या मार्गाने शुल्क आकारून शहरातील काही महाविद्यालये नफेखोरी करत आहेत. महाविद्यालयाचा कर्मचारी व विद्यार्थी हे दोघेही महाविद्यालयाचेच असतात.
पुणे : विद्यार्थ्यांकडून मिळेल त्या मार्गाने शुल्क आकारून शहरातील काही महाविद्यालये नफेखोरी करत आहेत. महाविद्यालयाचा कर्मचारी व विद्यार्थी हे दोघेही महाविद्यालयाचेच असतात. परंतु, कर्मचाऱ्यांसाठी मोफत पार्किंग उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांबाबत मात्र दुजाभाव होताना दिसत आहे. तसेच, महाविद्यालयांमधील पार्किंग शुल्कासाठी नियमावली तयार करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न शहरातील बहुतांश सर्वच नामांकित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना दररोज पार्किंगचे पैसे मोजावे लागतात. विनाअनुदानित अभ्यासक्रमांचे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अधिकाधिक शुल्क वसूल करण्याचा प्रयत्न महाविद्यालयांकडून केला जातो. त्यात महाविद्यालयाचे पार्किंग ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले जाते.
पार्किंगचे शुल्क वसुलीसाठी काही ठेकेदारांकडून ‘टग्यां’ची नेमणूक करतात. त्यामुळे महाविद्यालयाच्या पार्किंगचे कंत्राट देताना पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. पोलिसांकडून कंत्राटदाराची व पार्किंगचे पैसे वसूल करणाऱ्या कामगारांची तपासणी करूनच कंत्राट देण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घ्यायला हवा. पार्किंगचे शुल्क वसूल करणाऱ्या टग्यांकडून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अरेरावीची भाषा वापरली जाते. काही वेळा पार्किंगमधील गाडी पंक्चर केली जाते किंवा गाड्यांची मोडतोडही होते. परंतु, त्याची नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे पार्किंगसाठी पैसे का मोजावेत, असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत
आहे. (प्रतिनिधी)