‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:44 AM2019-07-30T11:44:14+5:302019-07-30T11:44:53+5:30
पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात.
चंदननगर : नगर रस्त्यावर मंत्री मार्केट येथील रस्त्यावर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, तरी देखील पार्किंग केले जात आहे. याकडे पोलीस मात्र दुर्लक्ष करीत आहेत.
आजूबाजूच्या परिसरात पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात. या ठिकाणी दिवसभर रस्त्यात व पादचाऱ्यांना अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने लावली जातात. या ठिकाणी पदपथाची वाहनचालकांकडून स्वच्छता केली जाते. तसेच कशीही वाकडी-तिकडी वाहने उभी केल्यामुळे परिणामी वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
'नो पार्किंग'चे फलक नसल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना अडचणी येत होत्या; मात्र त्यानंतर या ठिकाणी 'नो पार्किंग' करण्यात आली असून, तरीदेखील या ठिकाणी 'नो पार्किंग' करूनही काहीच फरक पडलेला नाही. याउलट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रास वाहने उभी केली जात असून, पूर्वीपेक्षा अधिक वाहने उभी करण्याचे प्रमाण
वाढले आहे.
......
तक्रार करणाऱ्यालाच वाहतूक पोलिसांनी केले टार्गेट
याबाबत मोठ्या प्रमाणात नो पार्किंगमध्ये पार्किंग केली जात असल्याची तक्रार श्रीधर गलांडे यांनी केली असता वाहतूक पोलिसांनी त्यांच्याच गाडीला जॅमर लावून त्यांच्याकडून दोन हजार रुपये वसूल केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नो-पार्किंगमध्ये बेकायदेशीर पार्किंग चांदरे कॉम्प्लेक्स ते टाटा गार्डरूम दरम्यान होत असल्याची तक्रार श्रीधर गलांडे यांनी पुणे ट्रॅफिककडे ऑनलाइन केली होती.
........
नगर रस्त्यावर चांदरे कॉम्प्लेक्स ते टाटा गार्डरूम दरम्यान हा भाग नो पार्किंग झोन असूनदेखील या ठिकाणी आणि बेकायदेशीर नो पार्किंगमध्ये पार्किंग केली जात असल्याची तक्रार मी पुणे वाहतूक पोलिसांकडे केली म्हणून विमानतळ वाहतूक पोलिसांनी मला टार्गेट करून माझ्या गाडीला जॅमर लावून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. - श्रीधर ज्ञानेश्वर गलांडे
श्रीधर गलांडे यांनी नगर रस्त्यावर मंत्री मार्केटसमोर त्यांची कार वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने भर रस्त्यात उभी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूककोंडी होत असल्याने त्यांच्या कारला जॅमर लावून त्यांच्यावर दंड आकारून कारवाई केली .- जितेंद्र कोळी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, लोहगाव विमानतळ विभाग
..........