Pune Metro: मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचेही पार्किंग; २४ तासाला फक्त ५ रुपये
By राजू इनामदार | Published: February 15, 2024 05:57 PM2024-02-15T17:57:35+5:302024-02-15T17:58:03+5:30
मेट्रोचे त्याच दिवशी घेतलेले प्रवासाचे तिकीट असेल तर वाहनतळावर वाहन लावणाऱ्यांना दरामध्ये २५ टक्के सवलत जाहीर
पुणे: महामेट्रोने त्यांच्या दोन्ही मार्गांवर मिळून एकूण ८ स्थानकांवर वाहनतळाची सशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहनांबरोबरच हेल्मेटही शुल्क देऊन तिथेच ठेवता येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अन्य काही सुविधाही देऊ करण्यात आल्या आहेत.
महामेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे दोन मार्ग सुरू आहेत. त्यातील पिंपरी-चिंचवड स्टेशन, संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, या पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील व शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ व आयडियल कॉलनी या पुण्यातील अशा एकूण ८ स्थानकांवर आता मेट्रो प्रवाशांना त्यांचे वाहन लावता येईल.
महामेट्रोने वाहनतळाच्या या जागा ठेकेदारांकडे चालवण्यासाठी दिल्या आहेत. यातील पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, शिवाजीनगर व सिव्हिल कोर्ट या स्थानकांवर दुचाकी प्रमाणेत चार चाकी वाहनांचेही पार्किंग करता येणार आहे. अन्य स्थानकांवर फक्त दुचाकी लावता येईल. सर्व वाहनतळांची क्षमता दुचाकींसाठी ६० च्या पुढे व चारचाकींसाठी ३० च्या पुढे आहे. ठेकेदारांमार्फत हे वाहनतळ चालवले जातील.
सायकलला २ तासापर्यंत २ रूपये, दुचाकीला १५ रूपये, चारचाकीला ३५ रूपये व २ ते ६ तासांसाठी अनुक्रमे ५, ३०, ५० रूपये, ६ तासांपेक्षा जास्त वेळ वाहन ठेवले गेले तर अनुक्रमे १०, ६० व ८० रूपये असा वाहनतळाचा दर असेल. त्याशिवाय या वाहनतळांवर मेट्रोच्या नियमीत प्रवाशांसाठी मासिक पासचीही सुविधा देण्यात आली आहे. मेट्रोचे त्याच दिवशी घेतलेले प्रवासाचे तिकीट असेल तर वाहनतळावर वाहन लावणाऱ्यांना दरामध्ये २५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. दुचाकी चालकांना त्यांचे हेल्मेट ठेवायचे असेल तर त२४ तासांसाठी ५ रूपये शुल्क द्यावे लागेल.
मेट्रो प्रवाशांकडून स्थानकांवर वाहनतळाची मागणी होत होती. तशी सुविधा केलेली आहेच, मात्र काही कारणांनी ती सुरू करणे थांबले होते. आता ८ स्थानकांवर अशी सुविधा देण्यात आली आहे. तिथे बूम बॅरियर, कॉक्रिंट फ्लोअर, दिवे असे सर्व काही असेल. मेट्रो प्रवाशांना याचा नक्की फायदा होईल.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो