वाहनतळ धोरण पुन्हा बासनात, महिनाभरासाठी पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:23 AM2018-03-16T00:23:23+5:302018-03-16T00:23:23+5:30
महापालिका आयुक्तांकडून मंजुरीसाठी आग्रह होत असलेले वाहनतळ धोरण स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. अभ्यासासाठी म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.
पुणे : महापालिका आयुक्तांकडून मंजुरीसाठी आग्रह होत असलेले वाहनतळ धोरण स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. अभ्यासासाठी म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या धोरणाला विरोध करीत सर्वसामान्यांना त्रास होऊ देणार नाही असे जाहीर केले होते.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही खासगी संस्थांच्या साह्याने हे धोरण तयार केले आहे. त्यात शहरातील विविध रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण, तेथील वाहनतळाची व्यवस्था याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यातील दुचाकींसाठी ठरवलेला दर जास्त असल्याची टीका होत आहे. तरीही या धोरणाला मंजुरी द्यावी व त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू व्हावी, असा आयुक्तांसह काही संस्थांचा आग्रह आहे.
मात्र, भाजपाचे शहराध्यक्ष गोगावले यांनी महापालिकेतील सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना दुचाकीधारकांना जाचक ठरेल असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे स्थायी समितीत आज प्रशासनाचा हा प्रस्ताव अभ्यासासाठी म्हणून महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही दोन वेळा हाच प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे.
>या धोरणाची विविध घटक संबंधित आहेत. त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याविषयी जाणून घेतल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल.
- योगेश मुळीक,
अध्यक्ष, स्थायी समिती