वाहनतळ निविदा आता परिमंडळनिहाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:29+5:302021-09-16T04:16:29+5:30
पुणे : एकाच ठेकेदाराला महापालिकेच्या मालकीचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याच्या निविदेला मुदतवाढ देऊनही याकरिता अद्याप कोणीच पुढे आलेले नाही़ ...
पुणे : एकाच ठेकेदाराला महापालिकेच्या मालकीचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याच्या निविदेला मुदतवाढ देऊनही याकरिता अद्याप कोणीच पुढे आलेले नाही़ त्यामुळे आता महापालिकेने परिमंडळनिहाय झोन करून वाहनतळ चालविण्यास देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे़
पुणे महापालिकेने शहराच्या विविध भागामध्ये ३० ठिकाणी वाहनतळ उभारले आहेत. या वाहनतळांचे संचलन खासगी ठेकेदारांमार्फत केले जाते. दरम्यान, महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी हे सर्व वाहनतळ एकाच ठेकेदार कंपनीला चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली होती. मर्जीतील एकाच ठेकेदार कंपनीला सर्व वाहनतळ चालविण्यास देण्यामागे एका मोठ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सदर मनसुबे मात्र मध्यंतरीच्या काळात हाणून पाडण्यात आले़ तर या विरोधात शहरातील अन्य वाहनतळ ठेकेदारांनीही एकजूट दाखवत, प्रसंगी न्यायालयीन लढ्याचाही इशाराही दिला होता.
यामुळे प्रशासनाने अन्य पयार्यांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भौगोलिक झोन करून, त्या झोनमधील वाहनतळांचा एक ग्रुप करून निविदा काढण्याचा पर्याय पुढे आला आहे. यात वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारांना वाहनतळावर अत्याधुनिक कॅमेरे तसेच संगणीकृत तिकीट व्यवस्था राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे़ तसेच नियमबाह्य दरआकारणी केल्यास ठरावीक तक्रारीनंतर कंत्राट रद्द करणे, अशा विविध अटींचा समावेश करण्याचेही नियोजन यामध्ये करण्यात आले आहे़
-------------------
मंडई येथील वाहनतळ खुले
मंडई येथे बंद असलेले सतीश मिसाळ वाहनतळ गणेशोत्सवानिमित्त आजपासून (दि. १६) खुले करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांनी दिली आहे़